तुमच्याकडे रेशन कार्ड नाहीय? मग ‘या’ पद्धतीने करा अर्ज, सरकारी कार्यालयातही जाण्याची गरज नाही..
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । रेशन कार्ड (Ration Card) योजना ही सरकारची खूप मोठी योजना असून यामध्ये पात्र शिधापत्रिकाधारकांना अत्यल्प दरात रेशन मिळते. केवळ धान्यासाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणून देखील रेशन कार्ड महत्त्वाचे कागदपत्र आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल आणि नवीन रेशन कार्ड बनवायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला नवीन रेशन कार्ड कसे बनवायचे याबाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात..
रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं असून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. फक्त रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब व्यक्तीला रेशन दिले जाते. भारतीय नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती रेशन कार्डसाठी अर्ज करू शकते. १८ वर्षांखालील मुलांचे नाव पालक रेशन कार्डमध्ये समाविष्ट करू शकतात. तर १८ वर्षांपुढील व्यक्ती वेगळ्या रेशन कार्डसाठी अर्ज करू शकते.
जर एखाद्या पात्र व्यक्तीला अद्याप शिधापत्रिका मिळालेली नसेल, तर त्याला त्याचे रेशन कार्ड दोन प्रकारे मिळू शकते – पहिले ऑनलाइन आणि दुसरे ऑफलाइन. विहित फॉर्म आणि कागदपत्रांद्वारे रेशनकार्डसाठी अर्ज करून कोणतीही व्यक्ती कार्ड मिळवू शकते. आम्हाला येथे स्टेप बाय स्टेप कसे नवीन रेशनकार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन बनवले जाईल? ते सांगत आहोत.
असा करू शकता ऑनलाइन अर्ज :
रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. महाराष्ट्रातील नागरिक mahafood.gov.in वर जावून अर्ज करू शकतात.
यानंतर Apply online for ration card या पर्यायावर क्लिक करा.
रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्ही ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्राइव्हिंग लायसन्स इत्यादी देऊ शकता.
रेशन कार्डसाठी तुमच्याकडून ५ रुपयांपासून ते ४५ रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाईल. अर्ज भरल्यानंतर शुक्ल भरून सबमिट करा.
फील्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा अर्ज योग्य असल्याचे आढळल्यास रेशन कार्ड मिळेल.
रेशन कार्ड बनवण्यासाठी या कागदपत्रांची गरज :
रेशन कार्ड बनवण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, सरकारद्वारे जारी करण्यात आलेले ओळखपत्र, हेल्थ कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स देवू शकता. याशिवाय, पॅन कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, उत्पन्नाचा दाखला, पत्त्याचा पुरावा म्हणून वीजेचे बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमें अथवा पासबुक, भाडेकरार इत्यादी कागदपत्रांपैकी काही कागदपत्र लागतील.
अर्जाचे स्टेट्स असे तपासा :
रेशन कार्डसाठी अर्ज केल्यावर तुम्ही घरबसल्यास अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता. यासाठी डिपार्टमेंट ऑफ फूडच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर Citizen Corner सेक्शनवर क्लिक करा.
आता Track Food Security Application वर क्लिक करा.
यातील चार पर्यायांपैकी एक भरा.
आता तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकता.
शिधापत्रिकेचे प्रकार
एपीएल रेशन कार्ड: – या प्रकारचे रेशन कार्ड राज्यातील अशा कुटुंबांसाठी जारी केले जाते, जे दारिद्र्यरेषेच्या वर आहेत. अशा लोकांना एपीएल रेशन कार्ड बनवता येते आणि सरकारकडून दर महिन्याला एपीएल कार्डधारकांना 15 किलो रेशनचे वाटप केले जाते.
बीपीएल रेशन कार्ड :- दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी बीपीएल रेशन कार्ड जारी केले जाते. अशा शिधापत्रिकेसाठी, ज्या व्यक्तीचे मासिक कौटुंबिक उत्पन्न 10 हजार रुपये किंवा त्याहून कमी आहे अशा व्यक्तीला पात्र मानले जाते. बीपीएल शिधापत्रिकाधारकांना सरकार दरमहा २५ किलो रेशन देते.
AAY रेशन कार्ड: – या प्रकारचे रेशन कार्ड त्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये कुटुंब अत्यंत गरिबीत जीवन जगत आहे. AAY शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून दरमहा ३५ किलो रेशन दिले जाते.