⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

दुपारी उन्हाचा चटका अन् पहाटे, रात्री गारठा; असे असेल पुढच्या आठवड्यातील तापमान

जळगाव लाईव्ह न्यूज : १४ फेब्रुवारी २०२३ : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठा बदल झालेला दिसून येत आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा तर पहाटे आणि रात्री थंडी असे वातावरण गेल्या चार दिवसांपासून काय आहे. दिवसा निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. दरम्यान अनेक ठिकाणी तापमान ३५ अंशाच्या वर असल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत. सांगली, सांताक्रुझ, रत्नागिरी येथे तापमान ३६ अंशांपार आहे. मात्र त्याच वेळी धुळे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथे किमान तापमान १० अंशांच्या जवळपास आहे.

राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. या तापमानातील चढ उताराचा आरोग्यासह शेती पिकांवर देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, पुढच्या आठवड्यात राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात मागच्या ४ दिवसांपासून तापमानात मोठा फरक दिसून येत आहे. गत २४ तासात सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी ३७.२ अंश तापमान नोंदले गेले. तर धुळे जिल्ह्यात रात्री सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात ८ अंश तापमान नोंदवले गेलं आहे. दरम्यान राज्यात पारा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा तर रात्री थंडी अशी परिस्थिती असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान मागच्या २४ तासांत पुणे ३४.१ (१०.६), जळगाव ३३ (१०.१), धुळे ३२ (८), कोल्हापूर ३५ (१९), महाबळेश्वर ३१.६ (१३.४), नाशिक ३१.२ (१०.९), सांगली ३६.१ (१७.३), सातारा ३५.२ (१६.४), सोलापूर ३७.२ (१६.५), रत्नागिरी ३६.४ (२१.२), औरंगाबाद ३२.२ (१०.२), नांदेड (१६.२), परभणी ३४.४ (१३.४), अकोला ३५ .२ (१२.५), ४.८), ब्रम्हपूरी ३३.७ (१४.६), चंद्रपूर ३१ (११), नागपूर ३१.८ (११.७) तापमानाची नोंद झाली.