⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | महामार्गाच्या समस्या : जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतले ‘डायमंडस्’चे म्हणणे, लवकरच ‘रामप्रा’सोबत बैठक

महामार्गाच्या समस्या : जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतले ‘डायमंडस्’चे म्हणणे, लवकरच ‘रामप्रा’सोबत बैठक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२२ । शहरातून जाणाऱ्या महामार्गासंदर्भात अनेक त्रुटी समोर येत आहेत. कुठे गतिरोधक उंच झाले तर कुठे नको त्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले. महामार्गावर पथदिवेच नाही, अंडरपासजवळ दिशादर्शक फलक नाही, अशा अनेक तक्रारीवर जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी तयार केलेल्या डायमंड्स ग्रुपवर चर्चा झाली झाली होती. चर्चेनुसार आज दुपारी काही मान्यवरांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली असता त्यांनी सर्व समस्या ऐकून घेतल्या. तसेच लवकरच यासंबंधी राज्य मार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत एकत्रित बैठक घेण्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासोबत झालेल्या बैठकीला जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, कैलास सोनवणे, ॲड.जमील देशपांडे, अमर जैन व प्रशांत नाईक हे उपस्थित होते. शहरातील महामार्ग चौपदरीकरण कामाशी संबंधित विषय ऐकून घेतले.

बैठकीत खालील विषयांवर चर्चा झाली…
१) महामार्गावर कुठेही आणि काहीही आकाराचे गतिरोधक तयार केले आहेत. (कलेक्टरसाहेब म्हणाले, राज्यपाल दौऱ्यात हा अनुभव मलाही आला. खोटेनगरजवळ फारच उंच गतिरोधक आहे)
२) गणेश कॉलनी स्टॉपजवळ जोडरस्त्यात गतिरोधक तयार झालेला आहे. तो चुकविण्यासाठी दुचाकीचालक डावीकडे घुसतात
३) महामार्ग तयार होत आला पण पथदिवे नाहीत.
४) अंडरपास ठिकाणी जाणारा-येणारा असे फलक लावावेत.
५) बांभोरीजवळ गिरणेवरील पूल कमकुवत होतोय. त्याला पर्यायी पुलाचा प्रस्ताव करावा.
६) नेल्सन मंडेला चौक, जनरल अरूणकुमार वैद्य चौक व इच्छादेवी चौकात सर्कलजवळ सिग्नल यंत्रणा हवी.
७) महामार्गात तयार केलेल्या डिव्हायडरचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे.
८) बाह्यवळण रस्ता कामास गती द्यावी.
९) तीनही सर्कलजवळ रिक्षा थांबे व बससाठीचे थांबे निश्चित करावेत.
१०) अंडरपास जवळ काही ठिकाणी रामप्राच्या जागेत टपऱ्या व हातगाड्यांचे अतिक्रमण वाढते आहे.
११) अपघात टाळायला रबरी गतिरोधकचा पर्याय वापरावा.
१२) इच्छादेवी चौकात सेंटर चुकलेला आहे.
१३) गतिरोधकची उंची व जागा ठरवायला मनपा प्रतिनिधी सोबत रामप्राने एकत्र जावे.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व विषय ऐकून घेतले आणि रामप्रा अधिकाऱ्यांसोबत लवकरच एकत्र बैठक घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले. विशेष म्हणजे बैठकीत एक सर्वांत महत्त्वाचा विषय समोर आला. तो म्हणजे शहरातील धार्मिकस्थळांचे अतिक्रमण. त्यावर सर्वांनी रस्ते खुले करण्यासाठी अतिक्रमण काढा अशी भूमिका घेतली आहे.

काय आहे हा डायमंडस गृप …

शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, अनुभवी मोजकी मंडळी एकत्र आली आहे. ते सर्वजण शहर विकासावर चर्चा करतात. नुसती चर्चा नाही तर कृती कार्यक्रमही आहे. त्या अनुषंगाने आज पहिली सकारात्मक बैठक झाली. कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसलेला हा अनोखा डायमंडस् गृप यापुढे शहरातील प्रेशर गृप म्हणून काम करणार आहे … विशेष म्हणजे या गृपमध्ये no gm … no good night … No birthday …no anniversary …. No self branding … हे बंधन आहे. फक्त आणि फक्त शहराच्या प्रश्नावर मोकळी चर्चा होते.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.