⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा, जळगाव जिल्ह्यासाठी असा आहे अंदाज?

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गणेशोत्सवानंतर सुरू झालेला मुसळधार पाऊस अद्यापही थांबण्याचं नाव घेत नसून अशातच आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुणे, जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर देखील मुसळधार पाऊस होईल. त्यामुळे पुण्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल झाल्याची माहिती आहे. तर बदलत्या हवामानामुळे उत्तर महाराष्ट्र तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर आज आणि उद्या पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल.

दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जळगावला २१ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील मागील काही दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने आज १८ सप्टेंबरपासून ते २१ सप्टेंबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.