जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । सध्या हवामान बदल असलं तरी उन्हाचा कडाका मात्र काही कमी होईना. अशातच आता देशातील काही राज्यांमध्ये पुढच्या पाच दिवसांमध्ये उष्णतेची लाट येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 25 ते 28 या चार दिवसांमध्ये उष्णतेची तीव्र लाट असणार आहे. ही लाट विशेषत: मध्य महाराष्ट्रात प्रकर्षाने जाणवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. विदर्भात 26 ते 28 दरम्यान उष्णतेची लाट असणार आहे. महाराष्ट्रासोबतच झारखंड आणि ओदिशा राज्यातही उष्णतेची लाट असणार आहे.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान, दक्षिण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात येत्या 26 ते 28 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येणार आहे. तसेच पंजाब आणि दक्षिण हरियाणामध्ये 27 आणि 28 हे दोन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते.
महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढच्या पाच दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पाऊसही पडण्याची शक्यता आहे. “येत्या 5 दिवसात राज्यात तीव्र हवामान सक्रिय राहण्याची दाट शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, लगतच्या मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता. तसेच 2, 3 दिवसांनंतर काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता. कृपया काळजी घ्या”, असं के सी होसाळीकर म्हणाले आहेत.