उष्णतेची लाट: गावोगावी वाढता धोका, आरोग्याची तातडीची खबरदारी

एप्रिल 27, 2026 4:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । उन्हाळ्यात उकाडा वाढतो, हे नवीन नाही. पण काही दिवस सलग तापमान खूप वाढते, रात्रीही गारवा राहत नाही आणि अंगावर जाळ बसल्यासारखे वाटते, तेव्हा ती साधी गरमी नसून उष्णतेची लाट असते. ही केवळ अस्वस्थता देणारी परिस्थिती नाही, तर शरीरातील पाणी कमी करून, रक्तदाब बिघडवून मेंदू, हृदय आणि मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम करू शकते.जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, उष्णतेच्या लाटा गंभीर आजार आणि मृत्यूचा धोका वाढवतात.

tp

जळगाव येथील महादेव हॉस्पीटल मधील न्युरोलॉजिस्ट डॉ.कमलेश तायडे सांगतात की, उष्णतेचा शरीरावर होणारा परिणाम सुरुवातीला साध्या लक्षणांनी दिसून येतो. खूप तहान लागणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, चिडचिड, हात-पायांना गोळे येणे, मळमळ आणि अंग गरम होणे ही सुरुवातीची इशारे आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास हीट एक्सॉश्शन आणि पुढे हीट स्ट्रोक होऊ शकतो. हीट स्ट्रोकमध्ये रुग्ण गोंधळलेला दिसतो, घाम कमी होतो किंवा थांबतो, बेशुद्ध पडण्याची शक्यता असते-ही जीवघेणी स्थिती आहे.ग्रामीण भागात हा धोका अधिक का असतो, याचे कारण म्हणजे शेतकाम, बांधकाम, पाण्यासाठीची पायपीट आणि उन्हात दीर्घकाळ राहणे.

अनेक घरांत थंड जागा, पंखा किंवा पुरेसे पाणी उपलब्ध नसते. त्यामुळे वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला तसेच मधुमेह, हृदयविकार आणि किडनीचे आजार असलेले रुग्ण अधिक धोक्यात असतात.उष्णतेपासून बचावासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी आणि विश्रांती. तहान लागेपर्यंत थांबू नका. वारंवार पाणी, ताक, लिंबूपाणी किंवा ओआरएस घ्या. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात काम टाळा आणि शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी काम करा. सैल, फिकट रंगाचे कपडे वापरा, डोक्यावर टोपी किंवा ओढणी ठेवा आणि अधूनमधून सावलीत विश्रांती घ्या.घरातही उष्णतेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दिवसा खिडक्या आणि पडदे लावून ऊन आत येऊ देऊ नका. शक्य असल्यास रात्री आणि पहाटे घरात हवा खेळती ठेवा.

लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना थंड व हवेशीर जागेत ठेवा. गाडीत किंवा बंद खोलीत कोणालाही एकटे सोडू नका.डॉ. तयडे यांच्या मते, काही लक्षणे दिसली की विलंब करणे धोकादायक ठरू शकते. जर व्यक्ती गोंधळलेली दिसत असेल, उलट्या होत असतील, चालता येत नसेल किंवा शुद्ध हरपत असेल, तर तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. अशा वेळी रुग्णाला थंड जागी हलवून अंगावर थंड पाणी टाकावे किंवा ओले कापड ठेवावे आणि लगेच रुग्णालयात न्यावे.फक्त वैयक्तिक खबरदारी पुरेशी नाही; गावपातळीवरही तयारी गरजेची आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विश्रांती केंद्रे, ओआरएसचा साठा आणि आशा-आंगणवाडी सेविकांमार्फत लोकांची नियमित तपासणी या उपायांनी मोठे नुकसान टाळता येते.

हवामान बदलांवरील आंतरसरकारी समितीच्या मते, उष्णतेसाठी पूर्वसूचना आणि आरोग्य कृती आराखडा हे प्रभावी उपाय आहेत.उष्णतेचा दीर्घकालीन सामना करण्यासाठी झाडे लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. झाडे सावली देतात आणि पानांमधील बाष्पोत्सर्जन प्रक्रियेमुळे परिसरातील तापमान कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे गावात स्थानिक, जलद वाढणारी झाडे लावण्यावर भर देणे गरजेचे आहे.

शेवटी, उष्णतेची लाट ही सहन करण्याची नव्हे, तर ओळखून टाळण्याची आपत्ती आहे. योग्य वेळी पाणी, सावली, विश्रांती आणि सामूहिक प्रयत्न-या साध्या उपायांनी अनेकांचे जीव वाचू शकतात.ाळण्याची आपत्ती आहे. योग्य वेळी खबरदारी घेतल्यास अनेक जीव वाचू शकतात, असे आवाहन डॉ. तयडे यांनी केले.
डॉ. कमलेश तायडे
न्युरोलॉजीस्ट, महादेव हॉस्पीटल जळगाव.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now