जळगाव लाईव्ह न्यूज । ताप्ती नदीवरील हतनूर प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, १५ जुलै रोजी सकाळी धरण ६७.५३ टक्के भरले असल्याची नोंद जलसंपदा विभागाने केली आहे. पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे दोन रेडियल गेट उघडण्यात आले असून ताप्ती नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

सध्या धरणाची पाणीपातळी २११.६०० मीटर असून, धरणाची पूर्ण जलसाठा पातळी २१४.००० मीटर आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २६२.०० दशलक्ष घनमीटर (६७.५३ टक्के) इतका झाला आहे. तर उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठा १२९.०० दशलक्ष घनमीटर (५०.५९ टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे.

पाण्याचे नियमन करण्यासाठी धरणाचे दोन रेडियल गेट प्रत्येकी ०.५० मीटरने उघडण्यात आले आहेत. या गेटमधून ७४ क्युमेक (सुमारे २,६१३ क्युसेक) पाण्याचा विसर्ग ताप्ती नदीपात्रात सुरू आहे. तसेच कालव्यामधून ५.६६ क्युमेक (२०० क्युसेक) पाणी सोडण्यात येत असून, आरएस गेटद्वारे अद्याप कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
यंदाच्या पावसाळ्यात हतनूर धरण परिसरात आतापर्यंत ११८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, मंगळवारी सकाळपर्यंतच्या मागील २४ तासांत परिसरात पावसाची नोंद शून्य राहिल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.
धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे ताप्ती नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.












