जळगाव लाईव्ह न्यूज । पश्चिम रेल्वेने गुजरातमधील उधना आणि उत्तर प्रदेशातील सुभेदारगंज दरम्यान धावणाऱ्या विशेष एक्स्प्रेसच्या सेवेला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. विशेष म्हणजे, खान्देशातील चार महत्त्वाच्या स्थानकांवर या गाडीला थांबा असल्याने हजारो प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रवाशांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन गाडी क्रमांक 04156 उधना–सुभेदारगंज विशेष एक्स्प्रेस आणि 04155 सुभेदारगंज–उधना विशेष एक्स्प्रेस या गाड्या आता १ सप्टेंबर २०२६ पर्यंत धावणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, या वाढीव फेऱ्यांसाठीचे आरक्षण १२ जुलैपासून सर्व पीआरएस आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
खान्देशातील चार स्थानकांना थेट लाभ
04156 उधना–सुभेदारगंज विशेष एक्स्प्रेस दर शुक्रवारी धावते. या गाडीला खान्देशातील नंदुरबार, अमळनेर, धरणगाव आणि भुसावळ या चार स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. अमळनेर येथे रात्री 7.57 वाजता, धरणगाव येथे 8.25 वाजता आणि भुसावळ येथे 10.15 वाजता गाडीचा थांबा आहे.
तर परतीच्या दिशेने धावणारी 04155 सुभेदारगंज–उधना विशेष एक्स्प्रेस दर मंगळवारी धावते. ही गाडी भुसावळ येथे सकाळी 7.50 वाजता, धरणगाव येथे 8.53 वाजता, अमळनेर येथे 9.14 वाजता तसेच नंदुरबार येथेही नियमित थांबा घेते.
उत्तर भारतातील प्रवास अधिक सोयीचा
या विशेष गाडीमुळे खान्देशातील प्रवाशांना गुजरातमार्गे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील विविध शहरांमध्ये थेट आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेषतः रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि धार्मिक कारणांसाठी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट आरक्षित करण्यापूर्वी गाडीचे अद्ययावत वेळापत्रक, थांबे, धावण्याचे दिवस आणि डब्यांची रचना तपासूनच आरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.







