जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात सध्या पावसाने उसंती घेतलेली असली तरी पाणलोट क्षेत्रात पुन्हा जोरदार पाऊस झाल्यानंतर हतनूर धरणाचे ४१ पैकी १८ दरवाजे बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पूर्णपणे उघडण्यात आले. यामुळे सुमारे एक लाख १६ हजार २५७ क्यूसेकने विसर्ग होत असून तापी खळबळून वाहत आहे.

दरम्यान, हतनूरचा विसर्ग वाढल्यानंतर शेळगाव बॅरेजचे सहा दरवाजे दीड मीटरने आणि तीन दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले. ज्यामुळे तापी नदीला मोठा पूर आल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

गेल्या दोन आठवड्यापूर्वी हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यांनतर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. वाढलेल्या पाणी पातळीमुळे धरणाचे ४१ पैकी २४ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले होते, तर सहा दरवाजे एक मीटरने उघडले होते. त्यानंतर मात्र पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण कमी होऊन पाण्याची आवक कमी झाली. परिणामी, हतनूर धरणाचे बहुतांश दरवाजे बंद करण्यात आले.
दरम्यानच्या काळात कमी-अधिक प्रमाणात विसर्ग सुरूच राहिल्याने तापीच्या पात्रात बऱ्यापैकी पाणी पातळी कायम होती. बुधवारी सकाळी पुन्हा पाण्याची आवक वाढल्याचे लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने हतनूरचे १८ दरवाजे पूर्णपणे उघडण्याचा निर्णय घेतला.








