जळगाव लाईव्ह न्यूज| २२ ऑगस्ट २०२३। जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील माहेरवाशीन विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून पैश्यांसाठी सतत छळ होत होता. दहा लाखांसाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या सात संशयित व्यक्तींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खेडी बुद्रुक येथील मनिषा राठोड यांचा विवाह अकोला येथील नितीन बळीराम राठोड यांच्याशी झाला आहे. लग्नानंतर काही दिवसांतच, मनीषाच्या वडीलांनी लग्नात हुंडा कमी दिला या कारणावरुन तिचा सासरी छळ सुरु झाला.
त्यानंतर घर बांधण्यासाठी १० लाख रुपये आणावेत अशी मागणी पतीसह सासरच्यांनी केली. वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केला. छळाला कंटाळून मनिषा माहेरी जळगाव येथे निघून आल्या.याबाबत त्यांनी रविवारी (ता. २०) एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यावरुन मनिषा यांचे पती निलेश राठोड, सासू प्रमिलाबाई राठोड (दोघे रा. अकोला), सचिन बळीराम राठोड (रा. अमरावती), बबली सुभाष चव्हाण व सुभाष चव्हाण (दोघे रा. मुंबई), वसंता जाधव, (रा. जयरामगढ, ता. खामगाव) व दामोदर काशीनाथ राठोड (रा. पातुर, जि. अकोला) या सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक अतुल पाटील तपास करीत आहेत.