जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२५ । गेल्या काही काळापासून शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray group) नेते शिंदे गटासह (Shinde Group) इतर पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आगामी काळात यांनी अर्धी ठाकरे सेना शिवसेनेत दिसेल असा दावा केला आहे.

सत्ता असताना कामे केली नाही आणि आता काम करणाऱ्या व्यक्तींवर टीका करीत आहेत. विरोधकांकडे केवळ विरोध करण्याचा धंदा राहिला आहे, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करताना त्यांचे कौतुक केल्यानंतर ठाकरे गटाकडून प्रतिक्रीया येत आहेत. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट ठाकरे गटाच्या नेत्यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. एकमेकांच्या विरोधात असले तरी चांगले काम करणाऱ्याचे कौतुक करण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे.
राज्यात सत्ता असताना काही लोकांनी कामच केले नाही. काम न करताच टीका करीत आहेत. हा प्रकार हास्यास्पद असून विरोधाला विरोध करणे हाच धंदा त्यांच्या आयुष्यात राहिला आहे. चांगले काम करण्याची मानसिकता नाही. हिंदूत्वाचा मुद्दा त्यांनी सोडला आहे. अडीच वर्षात शिंदेंनी केलेल्या चांगल्या कामाचे पवारांनी कौतुक केले. त्यामुळे त्यांच्यात पोटशुळ उठल्याची टीका केली. विचारधारा सोडून त्यांचा प्रवास सुरू आहे. खरी विचारधारा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर सक्सेस होताना दिसत आहे. बरेच जण शिवसेनेत वापसी करीत असून पुढच्या काळात अर्धी ठाकरे सेना शिवसेनेत दिसेल असे भाकीत केले. तसेच विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद देखील साधला.