⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

हाजी गफ्फार मलिक यांना मरणोत्तर ‘जळगाव रत्न’ पुरस्कार जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जून २०२१ । राष्ट्रवादीचे दिवंगत नेते हाजी गफ्फार मलिक यांचे सामाजिक,राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिलेले भरीव योगदान लक्षात घेऊन त्यांना महापालिकेतर्फे देण्यात येणारा ‘जळगाव रत्न’ हा मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्याची घोषणा महापौर जयश्रीताई महाजन यांनी आज केली.

येत्या महासभेत याबाबत प्रस्ताव मंजूर करून छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले. या अगोदर जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांना जळगाव रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले असून स्व. डॉ. अविनाश आचार्य आणि अँड. उज्ज्वल निकम यांनाही ‘जळगाव रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे . त्यांच्यासोबत हाजी गफ्फार मलिक यांनासुद्धा जळगाव रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

दिवंगत हाजी गफ्फार मलिक यांनी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. तसेच हिंदू मुस्लिम समाजात एकोपा कसा टिकून राहील यासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुस्लिम समाजाला शैक्षणिक प्रवाहात आणून अँग्लो संस्थेची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातही उच्चशिक्षित व्यक्ती तयार झाल्या आहेत . यासर्व बाबी लक्षात घेऊन त्यांना मरणोत्तर जळगाव रत्न पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती महापौर जयश्रीताई महाजन यांनी बोलताना दिली.