जिल्ह्यात पुन्हा गारपीटीसह वादळाचा हाहाकार ; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
जळगाव लाईव्ह न्युज| सुभाष धाडे । हवाखान खात्याने दिलेला अंदाज मुक्ताईनगर तालुक्यासाठी तंतोतंत खरा ठरत असुन,अवकाळी पाऊस,वादळ व गारपीट हि नैसर्गिक आपत्ती तालुक्याचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. काल पुन्हा झालेल्या गारपीटीमुळे तापी काठावरील केळी बागा उध्वस्त झाल्या.तसेच जोरदार वादळाने सर्वदुर हाहाकार माजवला.
तालुक्यातील चांगदेव परीसरात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने मोठमोठे वृक्ष उन्मळून पडली.ज्वारी,मका पीके आडवी झाली. तसेच केळीबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.याशिवाय उचंदे,शेमळदे,मेळसांगवे,नायगाव,बेलसवाडी,भोकरी,पिंप्रीनांदु,अंतुर्ली,धामणदे या तापी परीसरात गारपीटीसह वादळी पावसाने हजेरी लावत मोठमोठी वृक्षांना आडवे केले. विजेचे पोल उन्मळुन पडले.तसेच काही घरांवरील टिनपत्रे उडाली.वादळ एवढे भयंकर होते कि,चांगदेव येथील मोबाईलचा टॉवर पडला. परीसरातील पीकांना मोठा फटका बसला असुन परीसरातील शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले.
तालुक्यातील अनेक भागांत रात्री अवकाळीचा कहर सुरू होता.दहा मिनिटे गारपीट झाली.
दरम्यान रात्रीच मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी चांगदेव येथे प्रत्यक्ष जावुन पहाणी केली व लोकांना धीर देत प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले.
यापुर्वी शुक्रवारी तालुक्यातील सुकळी-दुई परीसरात गारपीट झाली होती.तोच पुन्हा काल इतर भागात गारपीट झाल्यामुळे केळी उत्पादक तालुका म्हणुन ओळख असलेला तालुक्याला अवकाळीच्या तडाख्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन नेला आहे.शेतकरी बांधवांचे कधी न भरुन येणारे नुकसान झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुर आर्थिक अडचणीत आलेला असुन शासनाकडुन उपाययोजनेसह तातडीची आर्थिक मदत शेतकऱ्यांसह शेतमजुरांना देण्यात यावी अशी अपेक्षा परीसरातुन होत आहे.