आता यूपीतील बुलडोझर पॅटर्न महाराष्ट्रात येणार ; ‘त्या’ नराधमाचे घर दोन दिवसात पडणार – गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२३ । भडगाव (Bhadgaon) तालुक्यातील गोंडगाव येथील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या घटनेतील आरोपीचे घर दोन दिवसात पाडण्यात येईल, असे आश्वासन जळगावचे पालकमंत्री गुलाबराव (Gulabrao Patil) पाटील दिले. तसेच याबाबत आपण जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना आदेश दिले असल्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे आता मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) आणि उत्तर प्रदेशातील बुलडोझर पॅटर्न महाराष्ट्रात येणार आहे.

गोंडगाव येथील आठवर्षीय चिमुकलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या करून तिचा मृतदेह कडब्याच्या कुट्टीत लपविला होता. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेच्या निषेर्धात आज मंगळवारी धरणगाव येथे विविध संघटना व नागरिकांतर्फे मोर्चा काढण्यात आला.

यावेळी मोर्चाला संबोधित करतांना गुलाबराव पाटील म्हणाले, पूर्वी आपण ऐकत होतो गावात राक्षस येतात. मात्र, आजही असे नराधम राक्षस जिंवत आहेत. या घटनेचा निषेध कराल तेवढा थोडाच आहे. मुलगी केवळ त्या आईवडिलांची नाही तर ती आपली सर्वाची आहे.

त्यामुळे या घटनेचा जलदगती न्यायालयात खटला चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यात येईल. तसेच त्या नराधम आरोपीचे घर दोन दिवसात पाडण्यात येईल याबाबत आपण जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांना आदेश दिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाचा प्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक बाप म्हणून आपण एवढेच सांगतो, त्या नराधमाला फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही.असंही ते म्हणाले