शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांवर गुलाबराव पाटलांनी दर्शवली नाराजी
जळगाव लाईव्ह न्युज | २३ मे २०२२ | शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियाना अंतर्गत सर्व तालुका प्रमुखांना आजपासून जबाबदारी देण्यात येणार आहे. मात्र तालुकाप्रमुख ती जबाबदारी पेलू शकतील की नाही यावर माझा विश्वास नाही. हे माझं स्पष्ट मत आहे. अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांवर शिवसेनेच्या बैठकीत स्पष्ट नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियाना अंतर्गत 26 ते 29 मे दरम्यान संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे नेते मंडळी येणार आहेत. यावेळी हे नेते मंडळी संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढवण्याचे काम करणार आहे याच बरोबर शिवसेनेने कशा प्रकारे प्रगती किंवा अधोगती केली आहे. याबाबतची माहिती ते घेणार असून वरिष्ठांना कळवणार आहेत. या अनुषंगाने अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे विशेष बैठकीचे आयोजन शिवसेनेतर्फे करण्यात आले होते. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना तालुकाप्रमुखांवर नाराजी व्यक्त केली.
यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, आतापर्यंत शिवसेना पक्षाने आपल्याला खूप दिले. आपल्याला सामावून घेतले. मात्र आता वेळ बिकट आहे. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर हल्लाबोल करत आहेत. अशा वेळी पक्षाला आपली गरज आहे. आणि पक्षासाठी आपण काम केलं पाहिजे. ज्या पक्षाने सगळ्यांना सगळेच दिले. त्या पक्षाला आज कार्यकर्त्यांची गरज असताना कार्यकर्ता मागे का पडतोय? प्रत्येक गावामध्ये स्वतःचे शाखाचा बोर्ड लावा असे आदेश देऊनही कित्येक गावांमध्ये अजूनही ते लागले नाहीयेत.
शिवसंपर्क अभियानादरम्यान आपल्या सगळ्यांकडे शिवसेनेचे वातावरण तयार करण्याची सुवर्णसंधी आहे. आपल्याला ही सुवर्णसंधी घालवता येणार नाही. आपण प्रत्येकाने आपापली जबाबदारी वाटून घेत शिवसेनेचा विस्तार केला पाहिजे.
आपण स्वतःला झोकून देऊन काम केले तर संपूर्ण राज्यात शिवसेनेचा जळगाव जिल्हा हा क्रमांक एकचा जिल्हा होईल असा माझा विश्वास आहे. मात्र त्यासाठी आपण निष्ठेने पक्षाचे काम करणे अतिशय गरजेचे आहे. स्वतःकडे एखाद्या पदाची जबाबदारी असेल तर ती जबाबदारी पार पाडा आणि जमत नसेल तर स्पष्टपणे सांगा पक्षाला अंधारात ठेवू नका. अशा शब्दात पदाधिकाऱ्यांना गुलाबराव पाटील यांनी काटीचक्या देखील दिल्या.