जळगाव जिल्हाबातम्याराजकारण

मंत्री गुलाबराव पाटील अन् नाथभाऊंची जेवणाच्या टेबलवर दिलजमाई; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२५ । जळगाव येथे एक अनोखी राजकीय घटना घडली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज 27 जानेवारी रोजी जळगावच्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात एकत्रित स्नेहभोजन केले. निमित्त होते जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीचे… दोघांच्या या डिनर डिप्लोमेसीची मात्र जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे

गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे हे दोन्ही एकमेकांवर सतत टीका करणारे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या एकत्र जेवणाच्या व्हिडिओने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले आहे. या भेटीत दोघांनी अर्धा तासपर्यंत चर्चा केली, ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत, एकनाथ खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “मी अनेकदा तक्रारी केल्या मात्र मला उत्तरच आलं नाही. वर्षभरात मी तब्बल 25 स्मरणपत्र प्रशासनाला दिली मात्र एकाही पत्राचं उत्तर मला आलं नाही. शासनाचं काम म्हणजे वांझोटेपणाचा कळस आहे.” खडसे यांनी यावेळी जिल्ह्यातील शिक्षणाच्या स्थितीबाबतही नाराजी व्यक्त केली, “पहिली ते सातवीचा वर्ग झाडाखाली बसतो या प्रगत जिल्ह्यामध्ये विद्यार्थी झाडाखाली बसणं ही गोष्ट काही चांगली नाही.”

लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांच्या प्रवेशाला काही मुहूर्त लागलेला नाही. गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्या एकत्र दिसण्यामुळे शरद पवार यांना आणखी एक धक्का बसणार का याची उत्सुकता वाढली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button