जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२५ । राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अडचणीत वाढवणारी एक बातमी आहे. ती म्हणजे जिल्हा बँकेचे चेअरमन असताना देवकरांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्याच ‘श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ’ या संस्थेला १० कोटी रुपयांचे कर्ज मजूर केले. मात्र त्यांच्यावर कर्ज देताना बँकेने ‘बँकिंग रेग्युलेशन कायद्या’चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांना कर्जाची तात्काळ एकरकमी वसुली करण्याचा चौकशी अहवाल धुळे जिल्ह्याच्या सहकारी संस्थांचे उपनिबंधक मनोज चौधरी यांनी विभागीय सहनिबंधकांना सादर केला. या अहवालामुळे जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?
धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक एस. जी. पाटील यांनी २४ जानेवारी २०२५ रोजी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. देवकर जिल्हा बँकेचे चेअरमन असताना तेच ‘श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ’ या संस्थेचेही अध्यक्ष होते. बँकिंग नियमांनुसार, कोणत्याही संचालकाला किंवा त्यांच्याशी संबंधित हितसंबंध असलेल्या संस्थेला कर्ज देण्यास प्रतिबंध असतानाही, देवकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांच्या संस्थेसाठी १० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला होता.

याप्रकरणी देवकरांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करताच दुसऱ्याच दिवशी चौकशी सुरू झाली होती. धुळे जिल्हा उपनिबंधकांच्या नेतृत्वात समितीकडून मे व जून महिन्यात चार सुनावणी घेण्यात आल्या. या चौकशीचा अहवाल उपनिबंधक मनोज चौधरी यांनी विभागीय सहनिबंधकांकडे सादर केला आहे. यात चौकशी अहवालात दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा बँकेने श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाला ६ मार्च २०२१ रोजी ७ कोटी रुपये आणि १३ जून २०२२ रोजी ३ कोटी रुपये असे एकूण १० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. विशेष म्हणजे, या कर्जाची परतफेड नियमितपणे सुरु असून सद्यस्थितीत संस्था थकबाकीदार नाही, असे अहवालात नमूद आहे.
तर दुसरीकडे नाबार्डच्या तपासणी अहवालातील शेऱ्याचा संदर्भ देत बँकेने संस्थेला कर्ज देताना ‘बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट १९४९’ च्या कलम २०’ कायद्याचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कर्जदार संस्थेकडून तात्काळ एक रकमी कर्ज वसुल करण्याची सुचना चौकशी अहवालात करण्यात आली आहे.
मनोज चौधरी यांच्या या अहवालामुळे देवकर यांच्यावर आता कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे. हा अहवाल देवकर यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात असून, यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.









