राज्य बँक असोसिएशनवर गुलाबराव देवकर बिनविरोध
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक मंडळ निवडणुकीत जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांची नाशिक विभागातून बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, संजय गरुड आदींनी श्री देवकर यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार केला.
राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक मंडळासाठी 21 पैकी दहा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित जागांसाठी 22 नोव्हेंबरला मतदान, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मतदार संघातून नाशिक विभागाकडून जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुंबई कोकण विभागातून सिद्धार्थ कांबळे, दिगंबर दुर्गाडे, औरंगाबाद विभागातून अर्जुनराव गाडे, अमरावती विभागातून वसंत घुईखेडकर बिनविरोध निवडून आले आहेत.