जळगाव जिल्हा

भोकर बँक दरोड्याच्या मुळाशी जा; सखोल चौकशी करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

विदगाव, भोकर व डिकसाईतील धाडसी ग्रामस्थांसह पोलिसांच्या तत्परतेचे पालकमंत्र्यांकडून विशेष कौतुक

घटनेची तातडीने दखल घेत पालकमंत्र्यांकडून बँकेची प्रत्यक्ष पाहणी; पोलीस अधीक्षकांना सखोल तपासाचे निर्देश

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोकर येथील भारतीय स्टेट बँकेवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करावी, गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिले.

घटनेची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर स्वतः भोकर येथील बँकेत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. बँक व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी संशयितांना पकडण्यासाठी धाडस दाखवणाऱ्या विदगाव, भोकर व डिकसाई येथील तरुण व ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. तसेच अल्पावधीतच परिसर पिंजून काढत संशयितांना पकडण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करणारे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांच्या संपूर्ण पथकाचेही कौतुक केले. बँक व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून दाखवलेल्या धैर्याचे आणि दरोडेखोरांना केलेल्या प्रतिकाराचेही त्यांनी कौतुक केले.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी परिसरात शोधमोहीम राबवत असताना पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तपासाचा आढावा घेतला. यापुढेही नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींबाबत सतर्क राहून त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) शनितीन गणापुरे, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, बँक व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी तसेच भोकर येथील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button