
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असून, माघारी घेतल्यांनंतर कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांत तापमानात काहीशी घट झाल्याने जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. दिवसा उन्हाचे चटके बसत असले, तरी रात्रीच्या वेळी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.
दिवसा उन्हाचा चटका, रात्री थंडीची चाहूल
गेल्या २४ तासांत जळगावचे कमाल तापमान ३६.८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८.३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. कमाल तापमानात काहीशी घट झाली असली, तरी दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता कायम आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसा उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
दुसरीकडे, रात्रीच्या किमान तापमानात घट झाल्याने वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडीची चाहूल, असे वातावरण सध्या जळगाव जिल्ह्यात अनुभवायला मिळत आहे.
जिल्ह्यात २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, हा अंदाज असून प्रत्यक्ष पावसाची स्थिती हवामानातील बदलांवर अवलंबून राहणार आहे.





