जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रचा गावातून हृदय पिळवटून टाकणारी आणि आरोग्य यंत्रणेची क्रूरता दाखवणारी घटना समोर आली आहे. मेडिकल कॅम्पमधून घरी आणल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत एका अडीच महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला. मात्र, या दुःखापेक्षाही मोठा धक्का जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) बसला, जिथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आजोबांना आपल्या मृत नातीचा देह रात्रभर मांडीवर घेऊन शवविच्छेदन विभागाच्या गेटवर बसावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून “आरोग्य यंत्रणेची माणुसकी हरवली आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी प्रचा गावातील सचिता दीपक बोरसे ही अवघ्या अडीच महिन्यांची बालिका होती. तिचे वडील दीपक दगा बोरसे हे भारतीय सैन्यात (आर्मी) अयोध्या येथे देशाची सेवा करत आहेत. गावात जिल्हा परिषद शाळेत आयोजित वैद्यकीय शिबिरात (मेडिकल कॅम्प) सचिताला नेण्यात आले होते. तिथून घरी आणल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच तिची प्रकृती कमालीची बिघडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पोलिसांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया करण्याचे सांगितले. त्यानुसार, रात्री साधारण दोन वाजेच्या सुमारास बालिकेचे आजोबा तुळशीदास शिवदास मराठे हे नातीचा मृतदेह घेऊन जळगाव शासकीय रुग्णालयात पोहोचले. मात्र, येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास साफ नकार दिला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.या निर्दयीपणामुळे हताश झालेले आजोबा त्या कडाक्याच्या थंडीत, अडीच महिन्यांच्या निष्पाप चिमुकलीचा मृतदेह मांडीवर ठेवून रात्रभर शवविच्छेदन विभागाच्या गेटबाहेर बसून राहिले.
सकाळी जेव्हा हा हृदयद्रावक प्रकार रुग्णालयात येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नजरेस पडला, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. सोशल मीडिया आणि परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग आली. त्यानंतर घाईघाईने प्रशासनाने बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला.
एकीकडे देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानाच्या मुलीचा असा करुण अंत होतो, आणि दुसरीकडे शासकीय रुग्णालयात तिच्या मृतदेहाची अशी विटंबना होते, याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.











