जळगाव जिल्हा

धान्य उचल करण्याची मुदत संपली, मार्चचे रेशनचे मोफत धान्य उशिरा मिळणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । जिल्ह्यात हमालांच्या संपामुळे मार्च महिन्यासाठीचे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य उचल करण्याची मुदत संपून गेली. त्यामुळे ही मुदत वाढवून देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. ही मुदतवाढ केंद्र शासनाच्या परवानगीने मिळणार असल्याने मार्च महिन्याचे मोफत धान्य लाभार्थ्यांना विलंबाने मिळेल.

रेशन दुकानांत एफसीआयच्या जळगाव वेअर हाऊस, युगश्री वेअर हाऊस पाळधी व कीर्ती वेअर हाऊस ममुराबाद या गोदामांमधून पुरवठा विभागातर्फे धान्य पुरवठा हाेताे. वाढीव मजुरीसाठी हमालांनी संप केल्याने गोदामांतून धान्य उचल करण्यास विलंब झाला. १८ जानेवारीनंतर गोदामांतून धान्य उचल करण्यास सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यासाठीचे ६२ टक्के रेशनच्या धान्याची उचल करून रेशन दुकानात पोहोच करण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्याची ७३ टक्के उचल गोदामांतून करण्यात आली आहे. मोफत व नियमित रेशनचे धान्य रेशन दुकानांत पोहोच करण्यात आले आहे. फेब्रुवारीचे मोफत व नियमित धान्य रेशन दुकानांत उपलब्ध आहे.

मार्चच्या रेशन धान्याची गोदामांतून उचल करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. या मुदतीत गोदामातून रेशनच्या धान्याची उचल करता आलेली नाही. ही उचल करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाने राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाला पाठवलेला आहे. धान्य उचल करण्यास मुदतवाढ मिळाल्यानंतर मार्च महिन्यासाठीचे मोफत धान्य रेशन दुकानात पोहोच करण्यात येणार आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य देण्याची कालावधी मार्च महिन्यात संपणार आहे.

Related Articles

Back to top button