⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

महावितरणचा शेतकऱ्यांना वीज दरवाढीचा ‘शॉक’ ; आता असे आहेत कृषी पंपांसाठीचे दर..

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२४ । महागाईने राज्यातील जनतेचे कंबरडी मोडली असता यातच आता महावितरणने वीज दरवाढीचा शॉक दिला आहे. कृषीसह सर्वच घटकांच्या विजेसाठी सहा ते आठ टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. कृषी पंपाच्या वीजदरात १२ टक्के वाढ केल्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणने जोरदार ‘शॉक’ दिला आहे. हे नवीन दर एप्रिल पासून लागू झाले आहेत.

आधीच शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. कधी अवकाळीचा मारा, तर कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ असा तिहेरी संकटाचा सामना शेतकरी करीत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला. त्यातच राज्यातील महावितरणने कृषी पंपाच्या वीजदरात वाढ केली आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने द्विवार्षिक वीज दरवाढीला मंजुरी दिली होती.

या वीजदरवाढीमुळे वीजदरात ६ ते १२ टक्के वाढ होणार असून, स्थिर आकाराचा अतिरिक्त बोजाही ग्राहकांवर पडणार आहे. हा आकार सर्व प्रकारच्या दरवाढीवर कमाल १० टक्क्यांपर्यंत आहे. ही दरवाढ आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांकरिता आहे. त्यामुळे मागील वर्षी १ एप्रिल २०२३ या आर्थिक वर्षात जवळपास तीन टक्के वीजदरवाढ करण्यात आली. आता २०२४ या आर्थिक वर्षापासून ही दरवाढ सहा टक्के लागू करण्यात आली. आधीच महागाई कमी होण्याचे नाव घेत नसताना दुसरीकडे महावितरणकडून झालेली दरवाढ कंबरडे मोडणारीच आहे.

असे आहेत कृषी पंपांसाठीचे दर
लघुदाब शेती पंपासाठी २०२२- २३ला ३.३० रुपये प्रतियुनिट दर होता. २०२४-२५ ला हा दर ४.५६ रुपये प्रतियुनिट झाला आहे. उच्चदाब शेती पंपासाठी ४.२४ रुपये प्रतियुनिट दर होता. २०२४-२५ साठी तो ६.३८ रुपये झाला आहे.