⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

ठाकरे सरकारसाठी उद्याचा दिवस महत्वाचा ; बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांचे पत्र

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारवर संकटात आली आहे. उद्याचा (३० जून) दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बहुमत सिद्ध करण्याची विनंती केली आहे.

महाराष्ट्रात अल्पमतात आलेल्या उद्धव ठाकरे सरकारची उद्या (३० जून) फ्लोर टेस्ट होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घटनेत दिलेल्या अधिकाराचा वापर करून उद्धव सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. विधानसभेचे अधिवेशन उद्या सकाळी 11 वाजता सुरू होणार असून, सायंकाळी 5 वाजेपर्यंत फ्लोअर टेस्ट पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथील कामाख्या मंदिराला भेट देऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी कामाख्या मातेला नवस मागितला. शिंदे गटाचे सर्व आमदार मंदिरात पोहोचले होते. दर्शनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी मी कामाख्या मातेकडे नवस मागितला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे सर्व आमदार आज (29 जून) गुवाहाटीहून गोव्याला जाणार असल्याचे वृत्त आहे. सर्व आमदार गोव्यात एक रात्र मुक्काम करून उद्या सकाळी ११ वाजण्यापूर्वी महाराष्ट्र विधानभवनात पोहोचतील आणि विधानसभेच्या कामकाजात भाग घेतील.