Sawada News-जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । ढोल ताश्यांचा कडकडाट, गुलाल फुलांची मुक्त उधळण व निर्बंधमुक्त वातावरणात सावदा येथे गणरायास निरोप देण्यात आला. शहरातील सुमारे २२ मंडळे सहभागी झाले होते. सकाळी ११ वाजेपासून घरगुती गणपती विसर्जन सुरू झाले. यावेळी लहान बाळगोपाळ यांनी देखील ढोल ताशाचे गजरात तल्लीन झालेले दिसून आले.

येथे दुपारी ३ वाजेदरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस बंद झाल्यावर सायंकाळी ४ वाजेदरम्यान मुख्यमिरवणुकीस सुरवात झाली. यात सुमारे २२ मंडळे सहभागी झाले होते. ढोल ताशे, बेंडचे गजरात व जल्लोषात यावेळी तरुणाई थिरकत होती. इंदीरा गांधी चौक, संभाजी चौक, चांदणी चौक, गांधी चौक, गवत बाजार, शिवाजी चौक, मोठा आड मार्गे ही भव्य मिरवणूक निघाली. गुलालाची उधळण, व गणपती बाप्पाचा जयघोष यावेळी निनादत होता. मिरवणुकीत, गांधी चौक मित्र मंडळ, संभाजी मंडळ, चैतन्य मंडळ, संताजी मंडळ, अमर मंडळ, एकता मंडळ, मोरया मंडळ, राणा मंडळ, शारदा मंडळ, गवत बाजार मंडळ, साळी बाग मंडळ, अजिंक्य मंडळ, प्रभात मंडळ, बुधवार पेठ मंडळ, यांचे सह अनेक मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली. ठीकठिकाणी मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव देखील करण्यात आला. रात्री ११.३० वाजे पर्यंत मिरवणूक संपन्न झाली.

दरम्यान, येथील श्री. शाम अकोले परीवार यांचे तर्फे गणेशभक्तांन साठी पुरी व भाजी वाटप करण्यात आली. यावेळी स.पो.नी. देविदास इंगोले व पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलिसांनी तसेच होमगार्ड जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला. रात्री हतनुर धरणावर यासर्व मंडळांनी गणेश विसर्जन केले, मिरवणुकीत महावितरण कर्मचारी, नगर पालिका कर्मचारी यांनी सहकार्य केले.











