⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

गुड न्यूज : शासकीय रुग्णालयात देखील होणार लसीकरण

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी शासकीय रुग्णालयांसह, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन ओपीडी दरम्यान लसीकरण सुरू करावे यांसह विविध प्रकारचे नियोजन जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत करण्यात आले होते. त्या अनुषंगाने अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सर्व रुग्णालयांना पत्र पाठवून लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे.

नुकतीच जिल्हा कोविड लसीकरण मोहीम टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. लसीकरणाचे शंभर टक्क्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार खासगी व शासकीय अशा दोन्ही रुग्णालयांतील सर्व डॉक्टर, कर्मचारी यांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावे, अशा सूचना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पत्राद्वारे रुग्णालयांना दिल्या आहेत. यासह शहरातही महापालिकेडून अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे संबंधित विभागाने सांगितले.

शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झाले असून आता केवळ खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे लसीकरण बाकी आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने हे लसीकरण पूर्ण करून घ्यावेत, असे आदेशही देण्यात आले आहेत.