जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२६ । गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत असताना आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. सोबतच चांदी दरातही मोठी घसरण झालीय. मुंबई, पुण्यापासून ते जळगावपर्यंत सोने चांदीच्या किंमतीत आज बदल झाला आहे.

काल मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. पण आज बाजार उघडताच सोन्याचं दर घसरले. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ₹३३० ने घसरून ₹१,५७,७५० वर आला आहे. तर प्रति ग्रॅम दर ₹१५,७७५ इतका झाला आहे.२२ कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली असून प्रति १० ग्रॅम ₹१,४४,६०० इतका भाव झाला आहे, जो कालच्या तुलनेत ₹३०० ने कमी आहे. त्याचबरोबर प्रति ग्रॅम दर ₹१४,४६० वर आला आहे.१८ कॅरेट सोन्याचे दरही घसरले असून प्रति ग्रॅम ₹११,८३१ इतकी किंमत नोंदवली गेली आहे.

दुसरीकडे आज चांदी दरातही मोठी घसरण झालीय. चांदीचा प्रति किलोचा दर १०,००० हजार रुपयांनी घसरून २,६५,००० रुपयावर पोहोचला आहे. दरम्यान पुढील काही दिवस सोन्या चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
घसरणीचे कारण काय?
अमेरिकेची मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्ह, तिच्या धोरण बैठकीत निर्णय घेण्यापूर्वी ही घसरण दिसून येत आहे. तथापि, भू-राजकीय तणाव आणि वाढत्या महागाईच्या चिंतेमुळे सोन्याच्या किमतीतील घसरण मर्यादित राहिली आहे.दरम्यान, सणासुदीच्या खरेदीसाठी ही घसरण ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ठरत असल्याचे मानले जात आहे.









