जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२६ । सध्या लग्नसराई सुरु असून यासाठी जर तुम्हीही सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदी भावात मोठी घसरण पाहायला मिळाली.

काय आहेत सोन्याचा दर
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, जळगावच्या सराफ बाजारात आज सकाळी २४ कॅरेटचे सोन्याचा दर तब्बल ५,९५० रुपयांनी घसरला आहे. यानंतर १० ग्रॅम सोन्याचा भाव १,४०,०२० रुपयावर पोहोचला आहे. २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं ५,४५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,२८,३५० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ४,४६० रुपयांनी घसरून १,०५,०२० रुपयावर पोहोचले आहे.

चांदीचा दर
सोन्यापाठोपाठ आज चांदी दरातही मोठी घसरण झालीय. जळगाव सराफ बाजारात आज सकाळी चांदीचा भाव तब्बल १५००० रुपयांनी घसरला आहे. यानंतर तुम्हाला आता एक किलो चांदी खरेदीसाठी २,३०,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.
घसरणीचे कारण काय?
सहसा, कोणत्याही आपत्ती किंवा जागतिक तणावाच्या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होते, परंतु यावेळी प्रकरण वेगळे आहे आणि मध्य-पूर्वेतील युद्धामुळे वाढलेल्या तणावानंतरही सोने-चांदीचे दर घसरत आहेत. यामागील कारणांचा विचार केल्यास, कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि डॉलरच्या मजबुतीमुळे मौल्यवान धातूंवर दबाव वाढला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमुळे महागाईचा धोका वाढला आहे आणि डॉलरच्या मजबुतीमुळे भू-राजकीय तणावाच्या काळातही मौल्यवान धातूंच्या वाढीला ब्रेक लागला आहे.










