गुन्हेरावेर

अमरावतीत ट्रक चालकाची हत्या करणाऱ्या आरोपीच्या रावेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२६ । अमरावती ग्रामीण भागात ट्रक चालकाचा गळा दाबून, पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला ट्रकमध्येच जिवंत जाळून मारणाऱ्या एका अट्टल आरोपीला रावेर पोलिसांनी अटक केली आहे. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या पथकाने केवळ एका अस्पष्ट फोटोच्या आधारे रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी पंजाबला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

am ravaer

नेमकी घटना काय?

अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उभ्या असलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये चालकाचा पूर्णपणे जळालेला मृतदेह आढळून आला होता. संशयिताने हत्येचे खरे कारण लपवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ट्रकला आग लावली होती. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती.

आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास अमरावती ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याशी संपर्क साधला. आरोपी जळगाव जिल्ह्यातील रावेर रेल्वे स्थानक परिसरात असून तो रेल्वेने पंजाबला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती त्यांनी दिली.

माहिती मिळताच पोलीस अधीक्षक धिवरे आणि रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तातडीने चक्र फिरवली. पोलिसांकडे आरोपीचा केवळ एक अस्पष्ट फोटो होता. मात्र, वेळेचे गांभीर्य ओळखून रावेर पोलीस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसर पिंजून काढला आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या आरोपीला अचूक हेरून ताब्यात घेतले.

मनप्रीतसिंह कश्मीरसिंह रंधावा (वय ४८ वर्षे रा. महमद, गाव मंध्रवाला, ता. अजनाडा, जि. अमृतसर (पंजाब) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. केवळ पैशांच्या किरकोळ वादातून आणि आर्थिक कारणातून त्याने मृत ट्रक चालकाचा आधी गळा दाबला आणि नंतर त्याला गाडीतच जाळून टाकले. आरोपीकडून पांढऱ्या रंगाची आयशर (Eicher) गाडी (क्रमांक: PB-02-EW 4299) हस्तगत करण्यात आली आहे.

अमरावती पोलीस जळगावकडे रवाना

सध्या आरोपी मनप्रीतसिंह रंधावा हा रावेर पोलिसांच्या ताब्यात असून, अमरावती ग्रामीण पोलिसांचे एक विशेष पथक आरोपीचा ताबा घेण्यासाठी जळगावकडे रवाना झाले आहे. केवळ एका अस्पष्ट फोटोच्या आधारे काही तासांत आंतरजिल्हा गुन्हेगाराला गजाआड करणाऱ्या रावेर पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button