⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सोन्याच्या किंमती गगनाला भिडणार! एकाच दिवसात तब्बल 1500 रुपयांची वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । केंद्र सरकारने (Central Government) सोन्याच्या आयातीवरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे पडसाद सराफ बाजारात उमटले. सरकारच्या या निर्णयामुळे काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (१ जुलै) सोन्याचा (Gold Rate) भाव तब्बल १५०० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीने ५२ हजार रुपयांची पातळी ओलांडली. मागील चार महिन्यात एकाच दिवसात सोने दरात झालेली ही मोठी वाढ ठरली.

सोन्याच्या किंमतीनी उसळी घेतली असली तरी चांदीला मात्र काही जास्त बदल झालेला नाहीय. सध्या एक किलो चांदीचा (Silver Rate) भाव ६२,००० रुपये इतका आहे.

सरकारने 5 टक्क्यांनी आयात शुल्क (Import Tax) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोन्यावर यापूर्वी 7.5 टक्के आयात शुल्क होते. आता त्यात वाढ होऊन ते 12.5 टक्के होणार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, सोने सर्वसामान्य माणसांच्या आवाक्या बाहेर जाईल. सोने खरेदी करणे ही पूर्वी फार चैनीची वस्तू नव्हती. एक दहा वर्षांपूर्वी सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात होते. पै पै जोडून सामान्य माणूस किडूकमिडूक घेत होता. आता किंमती अगोदरच वाढलेल्या असताना सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्याने सोन्याचे भाव अजून कडाडतील.

सोने खरेदी करणारा भारत हा जगातील दुसरा मोठा ग्राहक आहे. दरवर्षी सरासरी ८०० ते ९५० टन सोन्याची आयात केली जाते. यासाठी प्रचंड परकीय चलन खर्ची करावे लागते. सरकारने सोने खरेदीवर अंकुश आणण्यासाठी आज सोन्यावरील आयात शुल्क वाढवण्यात आला.

सोन्याचा भाव आणखी वाढणार!
दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, सरकारच्या या निर्णयानंतर सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होणार आहे. दुसरीकडे रशियानेही G7 देशांच्या सोन्याच्या निर्यातीवर बंदी घातली असून, त्याचा परिणाम देखील भारतीय बाजारावरही दिसणार आहे.