Gold Rate : बजेटपूर्वी सोने-चांदी दरात मोठी वाढ, आता जळगाव सुवर्णनगरीतील भाव वाचून फुटेल घाम..

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२५ । अर्थमंत्री निर्मला सितारमन आज २०२५-२६ वर्षांसाठी अर्थसंकल्प सादर करणार असून त्यापूर्वीच सोने आणि चांदी दरात पुन्हा वाढ झाली आहे. यामुळे जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या किमतीने विनाजीएसटी ८२ हजार रुपयांचा विक्रमी पल्ला गाठला आहे.
जळगावात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली. काल शुक्रवारी (३१ जानेवारी) सोने भावात १००० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याने सर्वकालीन उच्चांकी दराची हॅट्ट्रिक करत प्रती १० ग्रॅम शुद्ध सोने भाव ८२७०० (जीएसटीसह ८५१८१) रुपयांवर पोहोचला. चार दिवसांत सोने प्रती तोळ्यामागे २१०० रुपयांनी महागले आहेत.
सध्याची दरवाढ ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प राबवत असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाचा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. महिन्याभरातच गुंतवणूकदारांना सोन्याने ५ हजार ८०० रुपयांचा परतावा दिला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोने ७६,९०० रुपयांवर होते. त्यात सातत्याने वाढ होत ३१ जानेवारीला सोने ८२,७०० रुपयांवर पोहोचले. गेल्या आठवड्यात स्थिर असलेले सोने मंगळवारपासून वाढण्यास सुरुवात झाली. बुधवारी ८००, गुरुवारी ३०० रुपयांनी दर वाढ झाली. त्यापाठोपाठ शुक्रवारी दरात १ हजारांची वाढ होऊन सर्वकालीन दरवाढीचा विक्रम करणारा तिसरा दिवस ठरला. शुक्रवारी सोन्याचे प्रती तोळ्याचे दर ८२,७०० रुपयांवर पोहोचले. महिनाभरात सोन्याने पाच हजार ८०० रुपयांची वाढ झाली
चांदी एक हजार रुपयांनी महागली
शुक्रवारी चांदीच्याही दरात प्रती किलोमागे १ हजार रुपयांची वाढ झाली. मंगळवारी ९२ हजार रुपये किलो असलेली चांदी दररोज १ हजार रुपयांने महाग होत शुक्रवारी ९५ हजार रुपये (जीएसटीसह ९७,८५०) किलोवर पोहोचली आहे. दरम्यान, चांदीच्या दराने या पूर्वीच १ लाख रुपयांचा विक्रमी टप्पा गाठलेला आहे.