⁠ 
रविवार, मे 19, 2024

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करताय ; जाणून घ्या आजचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीपासून मागणी वाढत असल्याने जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात गेल्या आठ दिवसात १२८० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोने ४९ हजार ०४० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे.  तर दुसरीकडे चांदी देखील महागली आहे. गेल्या आठ दिवसात चांदीच्या भावात दोन हजार रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा भाव ६४ हजार ३६० रुपये इतका आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. गतवर्षी मार्चपासून उद्भवलेल्या कोरोनामुळे हाताबाहेर गेलेली, सामान्यांसह व्यावसायिकांना हतबल करून सोडणारी स्थिती आता नाही. जनजीवन, व्यापार हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. त्याचा सकारात्मक परिमाण सराफा बाजारावरील ग्राहकीवर झाला आहे.

जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये सप्टेबरच्या मध्यापासून घसरण होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात पितृपक्ष संपल्यानंतर वाढ सुरू झाली. पितृपक्ष संपताना सोने ४८ हजार तोळा, तर चांदी ६२ हजार रुपये किलो होती. नवरात्र सुरु झाल्यानंतर ८ ऑक्टोबरला सोन्याच्या भावात किंचित १०० रुपयाची घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर सोन्याच्या भावात सतत वाढ होत राहिली. १४ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात  ७४० रुपयांची वाढ होऊन ते ४९ हजार ०४०  रुपयांवर पोहोचले.

चांदीच्या भावातही ८ ऑक्टोबर रोजी वाढ झाली होती.त्यादिवशी चांदीच्या भावात २६० रुपयाची वाढ झाली होती त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा भाव ६२ हजार ६९० रुपयांवर पोहोचली होती.  काल गुरुवारी देखील चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती. काल १३३० रुपयाची मोठी वाढ झाली होती. त्यामुळे चांदीचा भाव ६४ हजार ३६० रुपये प्रतिकिलोवर स्थिरावली.

रेकॉर्ड स्तरापेक्षा ७१६० रुपयांनी स्वस्त

गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने ५६२०० रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या स्तरापेक्षा सोने सध्या ७१६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, आगामी काळात सोन्याचा भाव पुन्हा वाढेल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे.

कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डॉलर आणि बॉण्ड्सवरील व्याज वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव आहे. आगामी काळातही हा दबाव कायम राहील. मात्र, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे जगातील महागाईचा दर (Inflation Rate) वाढेल. अशा स्थितीत सोन्याची मागणी पुन्हा वाढेल आणि किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सोन्याचे भाव वाढण्याचा ट्रेंड पुन्हा सुरू होऊ शकतो. सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने मागणीही वाढेल आणि किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी सध्याचा काळ अत्यंत योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दिवाळीपर्यंत सोनं 49 हजारांवर

सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ शक्य आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत पोहोचू शकतो.