⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

कर्मचाऱ्यानेच लांबविले बँकेत तारण ठेवलेले सोने; काही तासातच गुन्हा उघड

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । आमडदे (ता.भडगाव) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ग्राहकांनी तारण म्हणून ठेवलेले सोने चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, यात बँकेतील कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून बँकेच्या शिपायासह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेची भडगाव तालुक्यातील आमडदे येथे शाखा असून याठिकाणी मॅनेजरसह तीन कर्मचारी नियुक्तीस आहेत. या बँकेत दि.२२ रोजी रात्री १ ते २.३० वाजेच्या सुमारास चोरी झाल्याची माहिती गावात पसरली होती, यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यांनतर भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळी चोरी करताना चोरांकडून बँकेचे कुलुप तोडणे, तिजोरी फोडणे, लॉकर तोडणे असा प्रकार करण्यात आलेला नव्हता, तसेच रोख रक्कमही आहे त्याच स्थितीत होती त्यामुळे या चोरीच्या घटनेत बँकेतीलच कर्मचार्‍यांचा सहभाग असावा, असा संशय पोलिसांना आला.

तिघे जण ताब्यात
घटनेनंतर पोलिसांनी बँकेच्या मागील बाजूस राहणारा बँकेचा शिपाई राहुल पाटील यास विचारपुस करत माहिती जाणून घेतली, यावेळी पोलिसांना संशय बळावल्याने त्याला खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी बँक शिपाई राहुल पाटील व त्याच्या अन्य दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्हयातील संशयितांची संख्या आणखी वाढू शकते अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

शेतातून काढून दिले सोने
पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशीत त्यांनी चोरी केलेले सोने एका संशयिताच्या आमडदे शिवारातील जोगडाकडील शेतात व आंचळगाव रस्त्याकडील शेतात खड्डा करुन लपविले असल्याची कबुली दिली व त्या ठिकाणावरून पोलिसांना पाच किलो सोन्याचे दागिने काढून दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, सहाय्यक फौजदार कैलास गिते, पोलीस कॉन्स्टेबल विलास पाटील, स्वप्निल चव्हाण, किरण पाटील, ज्ञानेश्वर महाजन, लक्ष्मण पाटील, चालक राजु पाटील आदी करीत आहेत.