“गोदावरी”च्या नाजनीन शेखने राष्ट्रपती भवनात जिंकली उपस्थितांची मने

मार्च 20, 2026 2:51 PM

‘पर्पल फेस्टिव्हल’मध्ये गायनाचे सादरीकरण

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील गोदावरी संगीत महाविद्यालयाची दिव्यांग नेत्रहीन विद्यार्थिनी नाजनीन तबस्सुम जमील शेख हिने आपल्या सुमधुर गायनाने नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानात आयोजित ‘पर्पल फेस्टिव्हल’ मध्ये उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

najanin shaikh

राष्ट्रपतींकडून कौतुकाची थाप

नाजनीनने सादर केलेल्या “गणाधीशाय गुणमण्डिताय” गीताने मंत्रमुग्ध होऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी तिचे विशेष कौतुक केले आणि तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एका सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या दिव्यांग मुलीने थेट राष्ट्रपती भवनात आपल्या कलेचे प्रदर्शन केल्याने जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जिद्द आणि मेहनतीचा प्रवास

नाजनीन सध्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पांतर्गत दिल्ली येथे गेली होती. ती सध्या दीपस्तंभ येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असून, तिच्या गायन कलेच्या कलागुणांना पैलू पाडण्याचे काम गोदावरी संगीत महाविद्यालय करत आहे. गेल्या ३ वर्षांपासून ती महाविद्यालयाच्या प्राचार्या पद्मजा नेवे व इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताचे शास्त्रशुद्ध धडे गिरवत आहे.

मान्यवरांकडून अभिनंदन

नाजनीनच्या या देदीप्यमान यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, संचालक डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रमोद भिरूड यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या या यशामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now