जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । गेल्या दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. यावेळी शिंदे गटाच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागलं होता. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत नवीन सरकार स्थापन केलं. आता महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही मोठा राजकीय भूकंप (Goa Political Crisis) येण्याची शक्यता आहे.
कारण गोव्यात काँग्रेसचे केवळ 11 आमदार आहेत. त्यापैकी 9 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. जर आमदारांनी भाजप प्रवेश केला तर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होऊ शकणार नाही. कारण त्यांची संख्या एकूण आमदारांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे. सध्या नाराज आमदारांची मनधरणी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
गोव्यातील काँग्रेसच्या बंडखोर आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश असून ते देखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी माहिती मिळत आहे. यापूर्वी 2019 मध्येही काँग्रेसला धक्का देत अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार की काय? अशा चर्चांनी जोर धरला आहे.
काँग्रेसचे 11 पैकी 9 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उत्तर देताना वरिष्ठ काँग्रेस नेते आणि आमदार दिगंबर कामत म्हणाले की, अशा चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहेत. सध्या मी माझ्या घरी आहे. काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव सध्या गोव्यात असून आमदारांशी संपर्क साधून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सोमवारपासून सुरू होणाऱ्या गोवा विधानसभेच्या अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी शनिवारी आमदारांची बैठक बोलावली होती. ज्यामध्ये पार्टीचे सर्व 11 आमदार सहभागी होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसनं आपल्या उमेदवारांना वेगवेगळ्या धार्मिक स्थळी नेऊन पक्षनिष्ठेची शपथ दिली होती. त्यामुळे आता हे आमदार पक्षनिष्ठेची शपथ मोडणार की, पक्षाशी एकनिष्ठ राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.