जळगाव जिल्हावासीयांसाठी आनंदवार्ता ! गिरणा धरणाचा जलसाठा ६१ टक्क्यांवर पोहोचला

जुलै 24, 2026 11:19 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२६ । जळगाव जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी ४४ टक्क्यांवर असलेला पाणीसाठा शुक्रवारी (२४ जुलै) सकाळी ७ वाजेपर्यंत थेट ६१.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. अवघ्या २४ तासांत जलसाठ्यात तब्बल १७ टक्क्यांनी वाढ झाल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत मिळत आहेत.

gnd

चणकापूर, हरणबारी, केळझर आणि पुनद धरणांमधून तसेच ठेंगोडा बंधाऱ्यातून सुरू असलेल्या विसर्गामुळे गिरणा धरणात सातत्याने पाण्याची भर पडत आहे. २४ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, गिरणा धरणातील उपयुक्त पाणीसाठा ३१९.२३८ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ४०४.१३७ दशलक्ष घनमीटर असून, धरणाची प्रत्यक्ष जलपातळी ३९३.७६८ मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक कायम असून, येत्या काही दिवसांत जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या गिरणा धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. सांडव्यावरील सर्व रेडियल गेट्स बंद असून, पीएलबीसी कालवा तसेच सिंचनासाठीचे आउटलेटही बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे धरणात येणारे पाणी पूर्णपणे साठविण्यावर भर दिला जात आहे. जलसंपदा विभागाकडून धरणातील पाण्याची आवक, जलपातळी आणि हवामानाच्या अंदाजावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.

जरी गिरणा धरण नाशिक जिल्ह्यात असले, तरी त्याचा सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होतो. हे धरण जळगाव जिल्ह्याची ‘जीवनवाहिनी’ मानले जाते.चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा आणि जळगाव तालुक्यातील १५० हून अधिक गावे तसेच चार नगरपालिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत हेच धरण आहे. त्यामुळे जलसाठ्यात झालेली वाढ जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now