⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

..तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो ; गिरीश महाजनांनी का मागितली माफी?

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२३ । राज्यात महापुरुषांवर करण्यात आलेल्या विधानांवरुन राजकीय वातावरण तापले आहे. याच दरम्यान भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर टिका करण्यात आली होती. त्यानंतर आता मंत्री महाजन यांनी स्पष्टीकरण देऊन माफी मागितली.

महाराजांचा अनादर करण्याचा माझा कुठेही हेतू नव्हता, मी महाराजांचा किती समर्थक आणि अनुयायी आहे हे सर्वांना माहिती आहे, शेवटी महाराज हे महाराज आहेत. महाराजांच्या नावाचा माझ्याकडुन अनवधानाने एकेरी उल्लेख झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो असं गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे.

झालेल्या चुकीबद्दल माफी मागण्यात कमीपणा नाही, पण त्याचं राजकारण होता कामा नये असं गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे. आजकाल कुणी काही बोललं तर लगेच चॅनलमध्ये, वर्तमान पत्रात जायचं, आरोप करायचे ही विरोधकांची पद्धतच झाली आहे.

पुणे येथील शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीच गिरीश महाजन यांनी एकेरी उल्लेख केल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती, त्यावरून गिरीश महाजन यांच्यावर टीका होऊ लागली होती.