मिस हेरीटेज इंडिया स्पर्धेत जळगावच्या गायत्रीने पटकावला मुकूट!
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । पुणे येथे नुकत्याच झालेल्या मिस हेरीटेज इंडिया स्पर्धेत जळगावची गायत्री ठाकूर हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, गायत्रीने ही स्पर्धा जिंकून आपल्या परिवारासह जळगावचे नाव लौकिक केले आहे.
मृणाल एंटरटेनमेंट आणि ग्रुमिंग आयोजित या स्पर्धेची अंतिम फेरी १५ व १६ सप्टेबर ला पुणे येथे निळू फुले नाट्यगृहात पार पडली. ही स्पर्धा फक्त सौंदर्य स्पर्धा नसून, यात इतर शरीर सौंदर्याच्या किंवा ग्लॅमरस स्पर्धांपेक्षा वेगळेपण आहे. त्यात भारतीय पुरातन वारसा जपणे हे मुख्य उद्देश आहे. मृणाल एंटरटेनमेंटच्या संचालिका मृणाल गायकवाड यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून उभी राहिलेल्या यास्पर्धेचे हे दुसरे पर्व होते. गायत्रीने अजिंठ्याची प्रतिकृती बनून त्याबद्दल माहिती आणि लावणी विषयी सध्याचे समज गैरसमज याविषयीचे कथन वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये केले.
गायत्री ही शहरातील आर. आर विद्यालयातील क्लार्क मनोज ठाकूर (वाघ) यांची कन्या आहे. तिला लहानपणापासूनच कलेविषयीची विशेष ओढ असून ती नृत्य, नाट्य त्याच बरोबर विविध गीतांमधून आपली कला सादर करत असते. तिने नाट्यशास्त्राची पदवी प्राप्त करून मुंबई विद्यापीठातून लोक कलेची पदवी सुद्धा घेतली आहे.