⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

दळभद्री राजकरणामुळेच जळगाव एमआयडीसीचा बोजवारा; उद्योजकांचा संताप

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । गेल्या 25 वर्षापासून जळगाव मध्ये मोठउद्योग आले नाहीयेत. यास राजकीय उदासीनता कारणीभूत असल्याचा सुर वजा संताप जळगाव एमआयडीसी मधील उद्योजकांनी जळगाव लाईव्हशी बोलताना व्यक्त केला. जळगाव जिल्हा हा उद्योगासाठी सर्व सुविधा असलेला जिल्हा आहे. रेल्वे, रस्ते आणि वीज या तिन्ही गोष्टीतून परिपूर्ण असतांना या ठिकाणी लोक उद्योग घेऊन येण्यास तयार होत नाहीत. याचे कारण म्हणजे राजकीय उदासीनता! जळगावमध्ये जर नवीन उद्योग आणायचे असतील तर त्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती लागते ती राजकीय इच्छाशक्ती जिल्ह्यात नसल्यामुळे जळगावत उद्योग येत नाहीत. याबाबत जळगाव लाईव्हने जिल्ह्यातील काही उद्योजकांशी संवाद साधला असतात खालील प्रमुख मुद्दे समोर आले.

उद्योजक अरुण बोरोले म्हणाले की, जळगाव हे एक केंद्रीकृत शहर आहे. जळगावहुन प्रत्येक उद्योजक मुंबई पुणे नागपूर इंदोर या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सहज आपली उत्पादन पोहोचवू शकतात. आता तर जिल्ह्यात विमानसेवाही उपलब्ध झाली आहे. मात्र जळगाव शहरात अजून उद्योग आले नाहीत. राजकारण्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे जळगाव शहराचा औद्योगिक विकास होऊ शकला नाही. मात्र आता जळगाव शहराचा विकास करणे अतिशय गरजेचे आहे. जास्तीत जास्त उद्योग या ठिकाणी येतील यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. याचबरोबर जळगाव मध्ये उद्योजकांची ‘मत’ कमी असल्यामुळे उद्योजकांकडे सर्वच सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याचे आम्हाला जाणवत आहे.

उद्योजक रवींद्र लढ्ढा यांच्या मते,जळगाव जिल्ह्यामध्ये उद्योग किंबहुना उद्योजक येत नाहीत यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे होत असलेले दुर्लक्ष. उद्योजकांना स्वतःचा उद्योग समजा एखाद्या भागात आणायचा असेल तर त्या ठिकाणचा पोषक वातावरण खूप महत्त्वाचं असतं. मात्र तेच जळगाव मध्ये नाही. जळगाव मध्ये असलेले जमिनीचे दर हे प्रचंड आहेत. पर्यायी उद्योजक या ठिकाणी येण्यास टाळाटाळ करतात. याचबरोबर वीज ही देखील उद्योजकांना मिळत नाही. कनेक्टिव्हिटीचे साधन देखील जळगाव मध्ये उपलब्ध नाही. म्हणूनच इथे नागरिक किंबहुना उद्योजक उद्योग घेऊन येत नाहीत. तंत्रज्ञान विकसित व्हावं असंही माझं मत आहे. संशोधन केंद्र जळगाव जिल्ह्यात नाहीत. जे आल्यावर उद्योजकांना येथे उद्योग आणावसं वाटेल.

उद्योजक महेंद्र रायसोनी म्हणतात की, जळगाव मध्ये उद्योक आले नाहीत यामध्ये जबाबदार कोण? ते म्हणजे नसलेली राजकीय इच्छाशक्ती. याचबरोबर महाराष्ट्र शासनाची चुकीची धोरण. या दोन्ही महत्त्वाच्या बाबींमुळे जळगाव जिल्ह्यामध्ये उद्योग येऊ शकले नाहीत. नवीन उद्योग आले की त्यांना नवीन नवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. मात्र शासन स्तरावर कोणतीही ठोस उपाय योजना करण्यात येत नसल्यामुळे इथून उद्योग निघून जात आहेत. यामुळे इथे उद्योग येत नाहीत.

उद्योजक रवींद्र फालक यांच्या मते,जळगावच्या बाजूला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचा औद्योगिक विकास होतो मात्र जळगाव जिल्ह्याचा तो होत नाही यामध्ये मुख्य कारण म्हणजे राजकीय उदासीनता. राजकीय नेत्यांनी दाखवलेल्या उदासनेतेमुळेच आज जळगाव जिल्ह्याचा विकास झाला नाहीये. औरंगाबाद पेक्षा सर्वच बाबींमुळे जळगाव अग्रेसर असूनही जळगाव औद्योगिक विकासात मागे पडल आहे. ते म्हणजे राजकीय नेत्यांनी दाखवलेल्या उदासनेतेमुळेच. याचबरोबर शासनाचे धोरणही एक प्रमुख कारण आहे. ज्या प्रकारच्या सोइ उद्योजकांना देणे गरजेचे होते त्या देण्यात आलेल्या नाहीयेत.

(क्रमश..)