जळगाव लाईव्ह न्यूज । पुरी – अहमदाबाद एक्स्प्रेसच्या बी-३ या डब्यातील बर्थ क्र. ७ च्या खाली बेवारस बॅगमध्ये १२ किलो गांजा सापडला. सहा पाकिटांमध्ये हा गांजा भरला होता. त्याची एकूण किंमत १ लाख २० रुपये आहे.

शुक्रवारी रात्री पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसने मलकापूर स्थानक सोडले. या गाडीच्या बी-२ कोचमधील बर्थ क्र.७च्याखाली बेवारस बॅग पडून असल्याची माहिती तिकीट निरीक्षक ललित बाबूराव मेश्राम (रा. नागपूर) यांना ८ वाजता माहिती मिळाली. नंतर आरपीएफ आयुक्तांच्या सूचनेवरून आरपीएफ निरीक्षक मीणा यांनी रात्री ९ वाजता गाडी भुसावळ स्थानकावरील फलाट २ वर येताच पंचासमक्ष बेवारस बॅग ताब्यात घेतली.

आरपीएफ कार्यालयात आणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसमक्ष ही बॅग उघडली असता त्यात सहा पाकिटे मिळाली. या पाकिटांमध्ये १२ किलो गांजा होता. आरपीएफने हा गांजा जप्त करून लोहमार्ग पोलिसांकडे सोपविला. १० हजार रूपये किलो दरप्रमाणे त्याचे मूल्य १ लाख २० हजार रूपये आहे.








