जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२१ । शिरसोली रस्त्यावर एल.एच.पाटील शाळेच्या मागील बाजूस सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्यासह एलसीबीच्या पथकाने गेल्या आठवड्यात छापा टाकला होता. कारवाईच्या तिसऱ्याच दिवशी एमआयडीसी पोलिसांच्या आशिर्वादाने अर्धा किलोमीटर पुढे पुन्हा जुगार अड्डा सुरू झाला होता. बुधवारी सहाय्यक अधिक्षकांच्या पथकाने छापा टाकत पुन्हा कारवाई केली. दरम्यान, एमआयडीसीतील कलेक्शन करणाऱ्या ‘त्या’ पोलिसांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जळगाव शहरातील जुगार अड्डे आणि सट्टापेढीबाबत ‘जळगाव लाईव्ह’ने वृत्त प्रकाशित करताच पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत कारवाई केली होती. पोलिसांच्या कारवाईत शिरसोली रस्त्यावरील एल.एच.पाटील शाळेच्या मागे शेतात सुरू असलेला जुगार अड्डा उधळून लावत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस अधिक्षकांच्या कारवाईनंतर तिसऱ्याच दिवशी अर्धा किलोमीटर पुढे हॉटेल आमंत्रणच्या मागच्या बाजुस जंगलात जुगार अड्डा सुरू करण्यात आला होता.
बुधवारी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, नितीन पाटील, अल्ताफ पठाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, रवींद्र मोतीराया, सुहास पाटील, महेश महाले, नीलेश पाटील यांच्या पथकाने जंगलात धाव घेतली. यावेळी तेथे जुगार खेळत असलेल्या आशिष राजकुमार तेजवाणी (रा.सिंधी कॉलनी), योगेश जीभाऊ हटकर (वय २५, रा.तांबापुरा), राकेश धनराज हटकर (वय २३) व जिभाऊ उत्तम हटकर (वय २६, रा.तांबापुरा) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पथकाने त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व दुचाकी असा १ लाख १९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तर मुकेश पाटील, भिला हटकर व पिंटु कोळी हे तिघे जण जंगलातून पळुन गेले. या सर्व सात जणांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी कारवाई तर केली परंतु ज्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा जुगार अड्डा सुरू होता त्यांना याबाबत माहिती नसावी का? गेल्या कारवाईनंतर कोणत्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने हा अड्डा पुन्हा सुरू झाला याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. पोलीस अधिक्षकांचा धाक एमआयडीसी पोलिसांना राहिला नाही की अर्थचक्र फिरविण्यासाठी पुन्हा जुगार अड्ड्याला अभय देण्यात आले असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यापुढे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- रेल्वेत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इतका पगार मिळेल?