जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या नोव्हेंबर महिन्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर सुखद बातमी आली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे पिकांचे जे नुकसान झाले होते, त्याची भरपाई म्हणून राज्य शासनाने जळगाव जिल्ह्यासाठी १० कोटी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय महसूल विभागाने जारी केला असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील केळी, कापूस, मका यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले होते.कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांनुसार, जिल्ह्यातील १० हजार ६५९ शेतकऱ्यांच्या सुमारे ८ हजार ३१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून जिल्हा प्रशासनाने भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.

या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने जळगाव जिल्ह्यासाठी १० कोटी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे १० हजार ६५९ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.







