जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । सध्या केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यात संबंध परिस्थिती आलबेल होऊन बसली आहे. पोलीस अधिक्षकांपासून स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांकडूनच अवैध धंदे चालकांना अभय देण्यात आल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेषतः जागोजागी उभ्या राहिलेल्या सट्टापेढ्या याचे जिवंत उदाहरण आहे. जळगाव शहरात सध्या कमीत कमी २५ सट्टा पेढ्या सुरु असून सर्वच्या सर्व सट्टा पेढी चालक मालकांची पोलिसांशी सलगी आहे. एमआयडीसी आणि शनिपेठ पोलीस ठाण्यापासून तर अगदी हाकेच्या सट्टापेढी सुरु असून देखील कारवाई शून्य आहे. सट्टापेढी मालक तर आम्ही पोलिसांना हफ्ता देतो असे बिनधास्त सांगतात. विशेष म्हणजे पोलिसांसह स्थानिक राजकारण्यांचे देखील अवैध धंदे चालकांशी साटेलोटे असल्याने कुणीही आवाज उठवायला समोर येत नाही. सरत्या वर्षात सुरु झालेल्या सट्टापेढ्या नवीन वर्षात बंद होतील अशी अपेक्षा जळगावकर व्यक्त करीत असले तरी कारवाई प्रत्यक्षात होते कि कागदोपत्री हे मात्र पाहावे लागणार आहे.
जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्याप्रमाणात बोकाळले असून चोऱ्या-चपाट्या, हाणामारी, खून हे काही लपून राहिलेले नाही. जिल्ह्यातील पोलिसींग ढिलावलेली असल्याचे हे सूचक असून एकेकाळी पोलीस अधीक्षक प्रवीण साळुंखे यांनी केलेली दहशत काही दिसत नाही. राष्ट्रवादी काँगेसने अवैध धंद्याबद्दल दिलेले निवेदन, त्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे, शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेले आरोप, अवैध वाळू वाहतुकीबाबत खा.उन्मेष पाटील, आ.राजूमामा यांनी पोलिसांवर ओढलेले ताशेरे, छावा मराठा युवा महासंघाचे अमोल कोल्हे यांनी दिलेले निवेदन, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात सुरु असलेला पत्त्यांचा सर्वात मोठा क्लब हे सर्वकाही समोर असताना देखील पोलीस प्रशासन ढिम्म असल्याने त्यांना सर्वसामान्यांची पडलेलीच नाही असे दिसते. वर्षभरात पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले असले तरी दुचाकी चोरी रोखण्यात, असोदा खून, निंभोरा दरोडा उघड करण्यात पोलीस अद्याप अपयशीच आहे.
‘या’ठिकाणी आहेत सट्टा पेढी
जळगाव शहरात सर्वाधिक सट्टा पेढ्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून सर्वात कमी जिल्हापेठ व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. अनेकवेळा वृत्त प्रकाशित झाल्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते मात्र ती केवळ नावालाच असते. सट्टापेढी बंद होण्याऐवजी माध्यमातून वृत्त प्रकाशित झाल्याने सट्टापेढी कुठे सुरु आहे याचीच माहिती नागरिकांना होते. शहरात सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरांच्या बाजाराजवळ, जळगाव टोल नाकालगत, भाजी मार्केट समोरील पेट्रोल पंपाजवळ, शिवशाही हॉटेलजवळ, शेरा चौकात, अशोक किराणा चौकात, तांबापुरा, सिंधी कॉलनी, खुबचंद साहित्या मार्केट जवळ, हनुमान नगर, मच्छी मार्केट याठिकाणी सुरु आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजराल पेट्रोल पंपाजवळ, मटण मार्केट समोर, आंबेडकर मार्केट याठिकाणी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेरी नाका स्मशानभूमीजवळ, झाशीची राणी चौकात, शनिपेठ बाजारजवळ, सराफ बाजार मागील गल्लीत याठिकाणी सुरु आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शामाप्रसाद मुखर्जी उद्यानजवळ, बळीराम पेठ, रेल्वे स्टेशन मागील परिसर याठिकाणी तर रामानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंप्राळा स्टॉप जवळ, हुडको परिसर, रामानंद नगर पाण्याच्या टाकीच्या मागे सट्टा पेढी सुरु आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील ग्रामीण भागात सट्टा पेढीला सुगीचे दिवस आहेत.
एका सट्टापेढीचा लाखभर हफ्ता
जळगाव जिल्ह्यात सुरु असलेल्या सट्टा पेढ्या दोन प्रकारच्या आहेत. एक प्रकार म्हणजे धंदा घेऊन स्वतःच ठेवायचा. या प्रकारात नफा जास्त असला तरी जोखीम देखील तेवढीच आहे. दुसरा प्रकार म्हणजे धंदा स्वतः घेऊन १० टक्के कमीशन पद्धतीने दुसऱ्याला द्यायचा. या प्रकारात नफा कमी असला तरी जोखीम काहीच नाही. सट्टापेढ्या पोलिसांच्याच आशिर्वादाने सुरु असतात. सध्या सुरु असलेल्या सट्टापेढ्यांचा कमी अधिक प्रमाणात २५ हजारांपासून १ लाखापर्यंत हफ्ता ठरलेला आहे. ओळख, राजकीय लागेबांधे, दररोजची उलाढाल यावर हफ्ता ठरलेला असतो. महिन्याचे सेक्शन दिल्याशिवाय पुढे व्यवसायच करता येत नाही. जळगावात सध्या सट्टापेढी चालकांकडून आकडा उतरवून घेणारे दोन मोठे दिग्गज आहेत. जे सट्टा पेढी चालक आकडा उतरवून देतात त्यांच्या सेक्शनमधील अर्धी रक्कम ते दिग्गज देत असतात. पोलीसदादांच्या आशिर्वादाने सर्वच मुजोर झाले असून कारवाईची भिती देखील त्यांना राहिलेली नाही.
‘ती’ पोलिसिंग हरवली कुठे?
जळगाव जिल्ह्यात अनेक पोलीस अधिकारी आजवर येऊन गेले. काहींचा कार्यकाळ अवैध धंदे चालकांसाठी कर्दनकाळ ठरला तर काहींचा काळ म्हणजे पर्वणीच ठरली. काही उपविभागीय अधिकाऱ्यांनी देखील मैदान गाजविले. उपविभागीय अधिकारी प्रशांत बच्छाव, सचिन सांगळे, निलाभ रोहन यांनी चांगलीच दहशत निर्माण केली होती. स्व.निरीक्षक वाय.डी.पाटील (अण्णा) यांच्या नावे तर गुन्हेगारांना थरकच भरत होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण साळुंखे तर कुणाच्याही रिक्षाने हव्या त्याठिकाणी अचानक धडक देत होते. गेल्या काही वर्षात हि पोलिसिंगच हरवली असून जागोजागी दिसणारे, गर्दीत हरवलेले गोपनीय शाखेचे कर्मचारी देखील आता पाहावयास मिळत नाही. विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे अभ्यासू आहेत, सर्वांशी प्रेमाने बोलतात, सर्व समजून घेतात पण आपल्या सूत्रांकडून माहिती घेत ठोस कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होते.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- Breaking : जळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
- बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा हृदयविकाराने मृत्यू ; यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना
- धक्कादायक ! जळगाव शहरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबारीची घटना