जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं जात आहे. तरी पण फसवणुकीच्या घटना घडतच आहे. अशातच जळगावातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पैसे तिप्पट करून देण्याचे आमिष देत एका व्यक्तीकडून भामट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड घेतली. त्याचे सहा लाख देण्याची बतावणी करीत पिशवीत लहान मुलांच्या खेळण्याच्या नकली नोटा देत फसवणूक केली. अनेक चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या अशा प्रकारच्या कथा जळगावात प्रत्यक्षात घडल्याने खळबळ उडाली आहे.
नथ्थू काशिनाथ कोळी (वय ४६, रा. बाळापूर फागणे, जि.धुळे) यांची फसवणूक झाली आहे. कोळी हे वाहनचालक आहेत. २६ फेब्रुवारी रोजी वाल्मीक शिवाजी पाटील हे कोळी यांच्या घरी गेले. भडगाव येथील भय्या महाजन (पूर्ण नाव माहिती नाही) नावाचा रुग्णवाहिकेचा चालक पैसे तिप्पट करून देतो, अशी माहिती पाटील यांनी दिली. त्यानंतर काही दिवसांनी पाटील व भय्या महाजन हे दोघे कोळी यांना फागणे गावाजवळील पेट्रोल पंपावर भेटले. पैसे तिप्पट करून देण्याची माहिती देत महाजन याने कोळींकडून १० हजार रुपये घेतले. ३० हजार रुपये आणून देतो, असे सांगितले.
त्यानंतर महाजन याने स्वत:चा मोबाइल नंबर कोळींना दिला. त्यानंतर १४ मार्च रोजी कोळींना एका मोबाइलवरून फोन आला. तुमचा नंबर महाजन याने दिला असून, पैशांबाबत सांगितले आहे. एवढाच निरोप त्या व्यक्तीने दिला. त्यानंतर १५ मार्च रोजी कोळी व पाटील यांनी भडगाव येथे जाऊन महाजनची भेट घेतली. जळगावात एक व्यक्ती नोटांचे सॅम्पल देईल त्याच्याकडे जा असा निरोप महाजनने दिला. त्यानुसार दोघेजण दुचाकीने जळगावात आले. व्यक्तीस फोन केला असता त्याने दोघांना भुसावळला बोलावले. त्या व्यक्तीची भेट घेतल्यानंतर त्याने ५००, २०० व १०० रुपयांच्या नोटा असे १७०० रुपये कोळींना दिले. नोटा खऱ्या असल्याची खात्री झाल्यानंतर कोळींनी ते पैसे स्वत:जवळ ठेवून घेतले. त्याच दिवशी सायंकाळी कोळी यांना पुन्हा एक फोन आला. दोन लाखांपेक्षा कमी रक्कम तिप्पट करून मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही दोन लाख रुपये घेऊन या, आम्ही सहा लाख रुपये देऊ, असा निरोप त्या व्यक्तीने दिला. त्यानुसार १८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता कोळी दोन लाख रुपये घेऊन फागण्याहून जळगावी आले. त्यांनी संबंधित व्यक्तीस फोन केला असता त्यांना अजिंठा चौफुलीवर थांबण्यास सांगितले. सकाळी १० वाजता एक अनोळखी व्यक्ती आला. त्याने कोळी यांच्याकडून दोन लाख रुपयांची रोकड घेतली. त्यानंतर स्वत: जवळील एक पिशवी कोळींना दिली. काही सेकंदांसाठी पिशवीची चेन उघडून त्यात सहा लाख रुपयांचे नोटांचे बंडल असल्याचे कोळींना दाखवले. ‘जल्दी निकलो’ असे सांगत तो अनोळखी व्यक्ती निघून गेला. काही अंतर पुढे आल्यानंतर कोळी यांनी पिशवी तपासली असता त्यातील बंडलच्या वरच्या व खालच्या बाजूस खऱ्या नोटा होत्या. तर आतील बाजूला लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर कोळी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.