⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

बनावट कागदपत्र बनवून तब्बल ३५ लाख २१ हजारांची फसवणूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| ४ ऑगस्ट २०२३। भुसावळ तालुक्यातील वराडशीम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव आणि लिपिक यांनी बनावट कागदपत्रे तयार करून कर्जदार सभासदांकडून परस्पर कर्जाची रक्कम वसूल करून संस्थेत जमा न करता तब्बल ३५ लाख २१ हजार ८५९ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आला आहे. या संदर्भात गुरुवार ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील वराडशीम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन सचिव भास्कर सिताराम पाटील राहणार जामनेर रोड भुसावळ आणि लिपिक तेजश्वर रामदास डाके राहणार वराड सिम भुसावळ यांनी २१ एप्रिल २०११ ते २० मे २०१९ दरम्यान संस्थेत कार्यरत असताना पदाचा दुरुपयोग केला. बनावट व खोटे कागदपत्रे तयार करून संस्थेतील सभासद यांच्याकडून परस्पर कर्ज वसुलीच्या रकमा जमा केल्या. जमा केलेल्या रकमा या संस्थेत जमा केल्या नाही.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यातील देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे सभासदांच्या नावावर कर्ज येणे बाकी दिसत असल्याचे समोर आले. या बनावट व खोटे कागदपत्राचे आधारे त्यांनी अफरातफर करून तब्बल ३५ लाख २१ हजार ८५९ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीला आले.

या संदर्भात गुरुवार ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ येथील सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक अधिकारी प्रमोद देविदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तत्कालीन सचिव भास्कर सिताराम पाटील आणि लिपिक तेजश्वर रामदास डाके या दोघांविरोधात अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी हे करीत आहे.