⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

धक्कादायक ! राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक, गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्युज । १९ जुलै २०२२ । ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच राज्यातील भाजपच्या चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. आई आजारी असल्याचं कारण देत एका तरुणाने महिला आमदारांकडून पैसे उकळले. याप्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

आमदार माधुरी मिसाळ यांच्या तक्रारीनंतर अखेर आर्थिक फसवणुकीचं हे प्रकरण समोर आलं आहे. आमदार माधुरी मिसाळ यांच्यासोबत देवयानी फरांदे, मेघना बोर्डीकर आणि श्वेता महाले यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं सांगितलं जातंय. आई आजारी आहे, असं म्हणत तरुणाने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. सामाजिक बांधिकली जपत आमदारांनीही तरुणाला मदत केली. पण आपली आर्थिक फसवणूक झाली असल्याची तक्रार आता महिला आमदाराच्या वतीने करण्यात आली आहे.

मुकेश राठोड नावाच्या तरुणावर आमदार माधुरी मिसाळ यांनी तक्रार दाखळ केली होती. त्यांने आपली आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप मिसाळ यांनी केलाय. फक्त आपलीच नव्हे तर आपल्यासह एकूण चार आमदारांना आर्थिक गंडा घातल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. सध्या पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी आमदार मिसाळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून घेतला असून आता पुढील तपास केला जातोय. आता या तरुणावर नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.