जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । शिरपूर तालुक्यातील बोरुडी येथून मजुरांना घेऊन एक जीप जळगावच्या दिशेने येत होती. विदगाव ते ममुराबाद दरम्यान एका वळणावर चारचाकी उलटली आहे. अपघातात एकाचा मृत्यू झाला असून १० ते १२ मजूर प्रवाशी जखमी झाले आहे.

शिरपूर तालुक्यातील बोरुडी गावातून काही मजूर चारचाकीने जळगावकडे येत होते. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास विदगाव ते ममुराबाद दरम्यान एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी रस्त्याच्या कडेला उलटली. चारचाकी एका भिंतीवर आदळली गेल्याने एक तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर इतर १० ते १२ मजूर जखमी झाले आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी झालेल्या पावसामुळे रस्त्यावरून चारचाकीचे चाक घसरून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत तरुण मजूर आजच पहिल्यांदा पाहुण्यासोबत मजुरी करायला घराबाहेर पडला होता, अशी माहिती घटनास्थळी मिळाली आहे.








