Bhadgaon : जबरी चोरी प्रकरणात चौघे पोलिसांच्या जाळ्यात, 37 हजाराचा मुद्देमाल जप्त

जुलै 16, 2025 4:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२५ । भडगाव तालुक्यातील गोंडगाव रोडवर झालेल्या जबरी चोरी प्रकरणात चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याकडून ३७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपाल संजय पारधी, मयूर ज्ञानेश्वर साळुंखे, अतुल नाना पाटील, आणि कैलास वाल्मिक पाटील (सर्व रा. पथराड, ता. भडगाव) अशी अटक केलेल्या संशयित चोरट्यांचे नाव असून याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Gondgaon robbery case 1

नेमका प्रकार काय?

फायनान्स कंपनीत फील्ड असिस्टंट मॅनेजर विक्की विठोबा पाटील (वय २४, रा. भालगाव बु.) हे ४ जुलै रोजी सायंकाळी ७.४५ वाजता ते ग्रामीण भागातून कर्जाचे हप्ते वसूल करून दुचाकीने पथराड येथून गोंडगावहून चाळीसगाव येथील कार्यालयात येत होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या बजाज प्लॅटिना दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांनी त्याला शिवीगाळ करत त्याच्या गाडीला लाथ मारली. त्यामुळे विक्की पाटील खाली पडले.

चोरट्यांनी त्यांच्या मोटारसायकलची चावी काढून रस्त्याच्या बाजूला फेकली आणि त्यांच्या पाठीला अडकवलेली बॅग हिसकावून घेतली. या बॅगेत ५८ हजार ४०० रुपये रोख रक्कम, मोबाईल आणि ॲक्सेस कंपनीचे बायोमेट्रिक मशीन असा एकूण ६५ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल होता. हा सर्व मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणानंतर हा गुन्हा पथराड गावातील काही तरुणांनी केल्याची माहिती भडगाव पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे संशयित गोपाल पारधी याला ताब्यात घेण्यात आले. त्याने कसून चौकशीत गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर साथीदारांची नावे मयूर ज्ञानेश्वर साळुंखे, अतुल नाना पाटील, आणि कैलास वाल्मिक पाटील (सर्व रा. पथराड, ता. भडगाव) अशी सांगितली. पोलिसांनी १३ जुलै रोजी मयूर साळुंखेला अटक केली. त्यानंतर १४ जुलै रोजी अतुल नाना पाटील आणि कैलास वाल्मिक पाटील यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now