⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

आता चक्रीवादळाचे सावट ; महाराष्ट्राला पावसाचा तडाखा बसणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । राज्यात मागील काही दिवसापासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. दिवाळीचा सण तोंडावर असून हिवाळा हंगामही सुरू झाला. मात्र, अद्यापही महाराष्ट्रात पाऊस थांबता थांबत नाही. यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. आता अशातच बंगालच्या उपसागरात सीतरंग’ चक्रीवादळाची (Cyclone) निर्मिती होण्याची शक्यता असून, महाराष्ट्रावर 23 व 24 रोजी हे वादळ घोंगावणार आहे. त्यामुळे पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

बंगालच्या उपसागरात 20 आणि 21 ऑक्टोबरपर्यंत सीतरंग’ चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. मात्र सीतरंग चक्रीवादळाचे मार्गक्रमण कसे असेल, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या वादळाचा परिणाम म्हणून 23 आणि 24 ऑक्टोबरला पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. चक्रीवादळ आणि पाऊस या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

बंगालच्या उपसागरात उत्तम अंदमान समुद्रालगत 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाली आहे. गुरुवारपर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्यकडे सरकताना आणखी तीव्र होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. सध्या एकीकडे राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार होत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात परतीच्या पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला. यामुळे पिकांची नासाडी झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.