लाली पान सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । आकाशवाणी चौकातील लाली पान सेंटर येथे बेकायदेशीररित्या गुटखा व पानमसाला विक्री करणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाशवाणी चौकातील लाली पान सेंटर येथे बेकायदेशीर गुटखा आणि पानमसाल्याची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा देवीदास महाजन यांनी सोमवारी ६ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पथकासह छापा टाकला. त्याठिकाणी काही विक्रीसाठी पानमसाला आणि गुटखा यांची साठवणूक केल्याचे आढळून आले.
यासंदर्भात अवैधरित्या गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांच्या फिर्यादीवरून रात्री लाली पान सेंटरचे मालक व चालक दिनेश फुलचंद हसवान रा. देवेंद्र नगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील हे करीत आहे.